जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायत कार्यालयात मारामारी;घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

। नेरळ । प्रतिनिधी ।
किरकोळ कारणावरुन ग्रामविकास अधिकारीपदी असलेल्या महिलेने ग्रामपंचायतीत काम करणार्‍या कर्मचार्‍याच्या कानाखाली मारल्याचा भयंकर प्रकार घडला. ही घटना कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रुपग्रामपंचायतीत घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्या महिला अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचार्‍यांकडून करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम यांच्यावर यापुर्वी देखील स्थानिक लोकप्रततिनिधींकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असे असतानाही कर्जत पंचायत समिती त्यांच्या विरोधातील सर्व तक्रारींवर डोळेझाक करण्याचे काम करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला अनुपस्थित असल्याबद्दल तसेच ग्रामपंचायतीत अनेक प्रकाराचे आर्थिक व्यवहार ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम यांनी केल्याचे निदर्शनास येताच सरपंच दीपक कार्ले यांच्यासह सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यांनतर ग्रामविकास अधिकारी यांना कर्जत पंचायत समितीने सक्तीच्या रजेवर पाठवून नवीन ग्रामविकास अधिकारी भालिवडी ग्रामपंचायतीसाठी नियुक्त केला होता. मात्र काही दिवसांनी पुन्हा ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम या भालिवडी ग्रामपंचायतीमध्ये पोहचल्या आणि त्यांनी पदभार स्वीकारून कार्यालयीन कामाला सुरुवात देखील केली होती.

ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून सुरु असलेले गैरव्यवहार सरपंच कार्ले आणि सदस्यांनी उघडकीस आणून त्याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामविकास अधिकारी कदम यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. 15 टक्के अनुदानाबाबत केलेला घोटाळा, अनधिकृत बांधकामांना परस्पर परवानगी देणे, कारवाई करण्यास टाळाटाळ, वेळेवर ग्रामपंचायतमध्ये उपस्थित न राहणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, कामाच्या बिलांवर जाणूनबुजून सही न करणे, सभेला वेळ न देणे, कामात अडथळा निर्माण करणे असे एक ना अनेक कामात, प्रकरणात सरपंचांसह कोणासही राजश्री कदम सहकार्य करीत नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहे.

स्थानिक ग्रामस्थ असलेले कर्मचारी हे लोकप्रतिनिधी आणि सरपंच यांचे ऐकतात. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करतात. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम यांनी चक्क एका कर्मचार्‍यांच्या कानाखाली मारली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. 11 एप्रिल रोजी हा प्रकार घडला असून त्यावेळी कार्यालयात स्वतः सरपंच दीपक कार्ले हे देखील उपस्थित होते. सरपंचांसमोर ग्रामविकास अधिकार्‍यांनी कर्मचार्‍याच्या कानाखाली मारल्याची बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी याबाबत गांभीर्य दाखविले नसल्याचा आरोप सरपंच कार्ले यांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ. चंद्रकांत साबळे यांच्याकडून ग्रामस्थांना आणि त्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version