मुरुड -आंबोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा

आरोप प्रत्यारोपांनी गाजली

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आरोप प्रत्यारोपांनी गाजली. मागील कालावधीतील प्रशासकीय कामकाज, निधीचा वापर, विकासकामे व शासकीय योजनांची विशेष तपासणी करून चौकशी करण्याबाबत तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्रकुमार खताळ यांना एक निवेदन देण्यात आले. सदर निवेदन प्रशासक वसंत दळवी यांनी स्विकारले असल्याची माहिती ग्रामस्थ धर्मेश मोरे यांनी दिली आहे.

आंबोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ नागरिक यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत काही बाबींची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येत असल्याने ग्रामपंचायतीच्या मागील 2021- 2022 ते 2024-2025 वर्षाच्या कालावधीतील कामकाजाची संबंधित अभिलेखांच्या आधारे तसेच प्रत्यक्ष स्थळपाहणी करून निष्पक्ष व सविस्तर चौकशी करण्यात यावी. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून या चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या विविध निधीचा वापर, 15वा वित्त आयोग, राज्य वित्त आयोग, मनरेगा व इतर योजनांच्या निधीची तपासणी, मंजूर विकासकामे व प्रत्यक्ष झालेल्या कामांची पडताळणी, अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे का? याची तपासणी, मोजमाप पुस्तिका, बिल, व्हाउचर व पूर्णत्व प्रमाणपत्रांची तपासणी, अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक लावण्यात आला आहे का? याची तपासणी, ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपांची तपासणी व त्यावरील कार्यवाही, ग्रामसभा ठरावांची अंमलबजावणी झाली आहे का याची पडताळणी, ग्रामपंचायत नोंदवही व आर्थिक अभिलेखांची तपासणी, शासकीय योजनांमधील लाभार्थी निवड व प्रत्यक्ष लाभाची पडताळणी, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, मनरेगा इत्यादी योजनांची तपासणी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थिती व कामकाजाची तपासणी, नागरिकांच्या अर्ज व तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहींची तपासणी, शासनाच्या निधीचा नियमबाह्य अथवा अनियमित वापर झाला आहे का याची पडताळणी, ग्रामपंचायत आंबोली वरील सर्व बाबींची सक्षम अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी, आवश्यक असल्यास संबंधित अभिलेख व कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात यावी, विकासकामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा/तपासणी अहवाल तयार करण्यात यावा, आर्थिक किंवा प्रशासकीय अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा लेखी अहवाल व करण्यात आलेल्या कार्यवाहींची माहिती देण्यात यावी, चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा इतर दबाव न ठेवता निष्पक्षपणे कार्यवाही करण्यात यावी. सदर बाब ग्रामस्थांच्या सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याने अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी. असे आंबोली ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून यावर पंचायत समिती प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version