‘ग्रामसेवक’ की ग्राम’भक्षक’

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आता विकासाची केंद्रे असण्यापेक्षा ग्रामसेवकांसाठी चरण्याची कुरणे बनली आहेत. जास्त उत्पन्न असणार्‍या ग्रामपंचायती आपल्या हाती लागण्यासाठी उरण तालुक्यातील ग्रामसेवक आपापले गट सक्रिय करीत असल्याने हे ग्राम ‘सेवक’ की ग्राम ‘भक्षक’, असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. काही हजारांचे पगारी नोकर असणार्‍या अनेक ग्रामसेवकांनी करोडो रुपयांच्या मालमत्ता उभ्या केल्याने त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी गावागावातून होत आहे.

जेएनपीए बंदर व सिडको यांच्या माध्यमातून उरण तालुक्याचा झपाट्याने विकास झाला. ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक लहानमोठे प्रकल्प व निवासी वसाहती उभ्या राहिल्याने अनेक ग्रापंचायतींचे उत्पन्न हजारातून लाखांच्या घरात गेले. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये राजकारण्यांच्या सत्ता संपादनाची स्पर्धा सुरू झाली. अनके अनाडी पुढारी पैशाच्या बळावर ग्रामपंचायत मध्ये सत्तेत बसले. पण सत्ता कशी चालवायची याचे त्यांना ज्ञान नसल्याने अनेक श्रीमंत ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक सत्ता सूत्रे हलवू लागले आहेत.

उरण तालुक्यातील जसखार, करळ, चाणजे, भेंडखळ, नागाव, जासई, नवघर, पागोटे, धुतूम, वेश्‍वी, बांधपाडा(खोपटे), कोप्रोली, फुंडे, बोकडविरा, चिर्ले, दिघोडे, विंधणे, मोठी जुई, चिरनेर,या क्रिम ग्रामपंचायती काही ठराविक ग्रामसेवकांनी आपली जहागिरी असल्याप्रमाणे ताब्यात ठेवल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये दरवर्षी लाखोंचा गैरव्यवहार होत आहेत. त्याबाबत उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे अनेक तक्रारी करूनही त्यांच्या लाडक्या ग्रामसेवकांना नेहमीच अभय मिळाले असल्याची खंत संबंधित ग्रामपंचायतीं मधील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरी उरण तालुक्यातील सर्रास ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करून आँडित करावे आणि ग्रामसेवकांच्या मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Exit mobile version