फिफा विश्वचषकाचे भव्य उद्घाटन

मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिकेवर विजय; दुसऱ्या सामन्यात चेकियाचा पराभव

| मेक्सिको | वृत्तसंस्था |

फिफा विश्वचषक 2026 ची सुरुवात एका भव्य आणि आकर्षक उद्घाटन सोहळ्याने झाली, ज्याने जगभरातील फुटबॉल चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. संगीत, रोषणाई आणि नेत्रदीपक आतषबाजीनं सजलेल्या या सोहळ्यात लोकप्रिय बँड ‘माना’, लॅटिन पॉप स्टार बेलिंडा, कोलंबियन गायक जे बाल्विन, जागतिक पॉप आयकॉन शकीरा आणि नायजेरियन कलाकार बर्ना बॉय यांनी दमदार सादरीकरण केले.

सह-यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषक 2026 च्या उद्घाटन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने पराभूत करुन उत्कृष्ट कामगिरी केली. मेक्सिको सिटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, यजमानांनी ज्युलियन क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांच्या गोलच्या जोरावर विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात करत, सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले. तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेकियाला 2-1 ने पराभूत करत मोहिमेची विजयी सुरुवात केली.

मेक्सिकोने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि नवव्या मिनिटाला त्याचे फळ मिळवले. ज्युलियन क्विनोनेसने दक्षिण आफ्रिकेचा बचाव भेदून एक शानदार गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुरुवातीलाच एक गोल करुनही, मेक्सिकोने सामन्यावर नियंत्रण ठेवलं आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला.

17 व्या मिनिटाला टेबोहो मोकोएनाला फाऊल केल्याबद्दल यलो कार्ड दाखवण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्क बसला. यानंतर, खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी 25 व्या मिनिटाला स्पर्धेतील पहिला हायड्रेशन ब्रेक घेण्यात आला. पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेला प्रभावी प्रत्युत्तर देता आले नाही.
इंज्युरी टाइममध्ये (90+2 मिनिटं) मेक्सिकोलाही धक्का बसला. खुलिसो मुआडूवर फाऊल केल्याबद्दल बचावपटू सेझार मोंटेसला रेड कार्ड दाखवण्यात आलं. मात्र, याचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला नाही. अंतिम शिट्टी वाजताच मेक्सिकोनं 2-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि आपल्या 2026 विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली.

दक्षिण कोरियाचा विजय 
दक्षिण कोरियानं पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत चेकियाला 2-1 नं पराभूत केलं आणि फिफा विश्वचषकात विजयी सुरुवात केली. दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक होता. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही, परंतु दुसऱ्या हाफमध्ये एकूण तीन गोल झाले, ज्यामुळे दक्षिण कोरियाला आघाडी घेता आली. चेकियाने 59व्या मिनिटाला गोल करुन 1-0 अशी आघाडी घेतली. लादिस्लाव क्रेजीनं चेकियासाठी पहिला गोल केला. मात्र, दक्षिण कोरियाला रोखणं अशक्य होतं आणि 67व्या मिनिटाला हाँग इन-बॉमनं बरोबरी साधली. त्यानंतर ओ ह्योन-ग्यूनं दक्षिण कोरियासाठी दुसरा गोल करुन 2-1 अशी आघाडी घेतली. चेक संघ शेवटपर्यंत ही आघाडी कमी करु शकला नाही परिणामी त्यांना पराभवाला सामोरं जावे लागले.
Exit mobile version