| उरण | प्रतिनिधी |
युईएस लिटिल सिड्स इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये बुधवारी (दि.29) गुरुपौर्णिमा प्रित्यर्थ ग्रँडपॅरेन्टस् डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैजनाथ म्हात्रे व मनिषा म्हात्रे यांच्यासह व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, ॲड. अपूर्वा ठाकूर, प्राचार्या सिमरन दहिया, तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, सर्व शिक्षिका, आजी-आजोबा आणि त्यांची नातवंडे उपस्थित होते.
पूर्व प्राथमिक विभागाच्या एका शिक्षिकेने आजी-आजोबांची महती सांगून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. त्यानंतर वैजनाथ म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. उपस्थितांमधून काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले व असा कार्यक्रम आयोजित केल्याबदद्ल संपूर्ण यु.ई.एस. परिवाराचे आभार मानले. तसेच, काही आजींनी सुंदर गीत सादर करुन सर्वांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आजी-आजोबांसाठी मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा आनंद उपस्थित सर्वांनी मनमुराद लुटला.







