जीवरक्षकांना अधिकृत मान्यता द्या!

पिरवाडी किनाऱ्यावर जीव धोक्यात घालून सुरू बचावकार्य

| उरण | प्रतिनिधी |

तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असून, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. मात्र, कोणतीही शासकीय सुरक्षा, आधुनिक साधने किंवा अधिकृत मान्यता नसताना हे बचावकार्य सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उरण तालुका मराठी पत्रकार संघाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करत पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर तातडीने सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. याशिवाय पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात यावी, प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नियमित नियंत्रण व्यवस्था सुरू करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार उरण तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण यांनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version