| पनवेल | प्रतिनिधी |
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आदई हिल येथे सुरू झालेल्या वृक्षारोपण मोहिमेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाने हरित चळवळीचे रूप धारण केले आहे. मेजर किसन चोराटे व त्यांच्या बिल्डिंगमधील सहकाऱ्यांनी 2013 साली या मोहिमेची सुरुवात केली होती. मात्र, कोरोना काळात या उपक्रमाला अधिक बळ मिळाले. पनवेल ट्रेकर्स, हिरवाई ग्रुप, आगरी कोळी डॉक्टर्स ग्रुप, संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट यांसारख्या विविध सामाजिक संस्थांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. परिणामी, आजपर्यंत 10 हजारांहून अधिक झाडे लावण्यात यश आले आहे. वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी मातीचे बंधारे बांधले जात होते; परंतु, ते पावसाळ्यात वाहून जात असल्याने कायमस्वरूपी उपायाची गरज भासू लागली. त्यासाठी अरुण रोकडे, नितीन वाघमारे आणि संतोष टकले यांनी पुढाकार घेत दोन सिमेंट कॉक्रिटचे मजबूत बंधारे उभारले. या कामासाठी नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून सुमारे 3.75 लाख रुपये खर्च केला. या उपक्रमात उत्तम ढेबे, लक्ष्मण तळेकर, हातिसकर, मनोज म्हात्रे, रवि शेळके, हरिश शेळके, ॲड. नागेश हिरवे, रविंद्र गोविंद यांसह अनेक सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले. तसेच आदई गावातील ग्रामस्थांचेही विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीतर्फे 500 किलो स्टील व सेंट्रिग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
आदई हिलवर हरित क्रांती
