| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत हद्दीतील दुधणी गावामध्ये नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमीपूजन बुधवारी (दि.25) जिल्हा परिषद शाळेजवळ पार पडले. दुधणी गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अधिकृत अंगणवाडी केंद्राची सुविधा उपलब्ध झाली असून, हा गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. यापूर्वी हे केंद्र स्वरदिव्या वेल्फेअर फाऊंडेशन पुणे-रायगड यांच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात चालविण्यात येत होते. सातत्यपूर्ण पाठपुरावा व संबंधित विभागांशी समन्वय साधून जून 2025 पासून महिला व बालविकास विभागाअंतर्गत या अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली असून सध्या अंगणवाडी समाज मंदिर येथे सुरू आहे. यावेळी गटविकास अधिकारी लता मोहित, बाल विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विता करंगुटकर, सरपंच करुणा साठे यांच्यासह सुभाष पाटील, सचिन साठे, संतोष लाड, मंगेश देशमुख, पांडुरंग खताळ, मधुकर नाईक, नवनाथ देशमुख, सोनाली साठे, अनुराधा साठे आदींसह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







