उरणमध्ये शिक्षणाची ऐशीतैशी

गटविकास, गटशिक्षणाधिकार्‍यांची पदे रिक्त

। उरण । वार्ताहर ।

उरण पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या गटविकास अधिकारी, सहाय्य गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारीपदी कायमस्वरूपी नियुक्ती न करण्यात आल्याने जनतेत व शिक्षक वर्गात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत शासनाच्या उदासीन धोरणामुळे पंचायत समितीचे कार्यालय गटविकास अधिकारी, सहाय्य गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारीविना पोरके झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन.एन गाडे या मे 2022 रोजी सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या रिक्त झालेल्या पदाचा चार्ज हा पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र भोये हे पनवेल पं. समितीचे गटविकास अधिकारी असल्याने उरण पंचायत समिती कार्यालयात त्यांची उपस्थिती दर्शविली जात नाही. त्यातच सहाय्य गटविकास अधिकारी हे ही पद रिक्त आहे. त्यामुळे समस्या घेऊन ये- जा करणार्‍या नागरीकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

रिक्त असलेले गटशिक्षणाधिकारी हे पद मागील पाच वर्षांपासून कायमस्वरूपी न भरल्याने निवृत्त शिक्षकांना तसेच शिक्षकवर्गाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून प्रियांका पाटील यांच्याकडे चार्ज आहे. परंतु सक्षम, कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकार्‍याची नियुक्ती शिक्षण विभागात होत नसल्याने तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे असे बोलले जात आहे.

Exit mobile version