शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरणारा म्हणून वाढता पाठिंबा
| अलिबाग | भारत रांजणकर |
कोकण शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणार्या शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढे देत न्याय्य हक्कासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बाळाराम पाटील यांना कोकणातील शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टी.डी.एफ., माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तसेच अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ इत्यादींच्या पाठिंब्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे मिळून हा मतदारसंघाची रचना आहे. विस्तृत प्रदेश असल्याने मतदारांशी संवाद साधणे, संपर्कात राहणे मोठे जिकिरीचे काम ठरत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या पाठबळावर राजकीय पक्षांना आपली वाटचाल करावी लागत आहे. या मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात बाळाराम दत्तात्रय पाटील (शेकाप/मविआ), भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, धनाजी नानासाहेब पाटील (जनता दल युनायटेड), उस्मान इब्राहीम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), रमेश नामदेव देवरुखकर (अपक्ष) आणि संतोष मोतीराम डामसे (अपक्ष) असे एकूम आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.
मतदारसंघात एकूण 37 हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 14 हजार 995, रायगडमधील 10 हजार 087, पालघरमधील 6 हजार 718, रत्नागिरीमधील 4 हजार 069 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 हजार 164 मतदारांचा समावेश आहे. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेकापने रायगडमधील, तर भाजपने शिंदे गटाचा आयात केलेला ठाणे जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे.
बाळाराम यांच्यासाठी महाविकास आघाडीची साथ, तसेच रयत शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, पिएनपी एज्यूकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटीची साथ महत्त्वाची ठरणार आहे. पूर्वी या मतदारसंघावर भाजपप्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा होता. सुरुवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. वसंत बापट आणि मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थान खालसा केले होते. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. आपल्या आमदारकीच्या काळात बाळाराम पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून दिले. अनेक योजनांचा लाभ शिक्षकांसाठी मिळवून दिला. तेच त्यांचे काम निर्णायक विजयाकडे घेऊन जाईल, असे मानले जात आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे तीन हजार मतदार असून, पालकमंत्री रवींद्र चव्हाण या निवडणुकीत इतके व्यस्त आहेत, की मोकाडा तालुक्यातील सावर्डे येथे दोन लहान बालकांचा मृत्यू झाला असता मंत्री म्हणून नव्हे, तर पालक म्हणून भेट देण्यास गेले. या जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसून पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आ. श्रीनिवास वनगा यांच्यावर निवडणुकीची धुरा आहे. राष्ट्रवादीचे आ. सुनील भुसार यांचा प्रभावही याठिकाणी दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात साडेदहा हजार मतदार असून, बाळाराम पाटील पनवेलचे असल्याने कोकण सोसायटी, रयत शिक्षण संस्था, सुधागड एज्युकेशन सोसायटी, पीएनपी एज्युकेशन या चारही संस्था त्यांच्या मनापासून पाठी असून, खा. सुनील तटकरे व त्यांची कन्या, सुपुत्र आमदार प्रचारात अग्रणी आहेत. त्याउलट, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा. श्रीरंग बारणे फक्त सभेतच दिसतात, अशी तक्रार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी पंडित पाटील, जिल्हा शेकाप चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांच्यावर या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी असून, किंबहुना ही पाटील कंपनीची निवडणूक आहे, अशा तर्हेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेण व सुधागड तालुक्यात माजी आ. धैर्यशील पाटील व कर्जत खालापूरमध्ये माजी आ. सुरेश लाड प्रचारात आहेत. बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार आपल्या जिल्ह्यासाठी निवडणूक रिंगणात जोमाने काम करीत आहेत.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत प्रचारात अग्रणी असले तरी तीन हजार मतदार असलेल्या जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खा. राजन साळवी, आ. भास्कर जाधव यांच्यासोबत सह्याद्री शिक्षण महर्षी राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम प्रचारात अग्रभागी आहेत.