| आगरदांडा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस आमदार जयंत पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांनी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कट्टा शाखेला भेट दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांनी जिल्हा बँक शाखा कट्टा येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शाखा व्यवस्थापक लिंगायत, अमोल गाड, गिरीश आळवे, सारिका ठाकूर, डी.बी. गावडे, रावले, रामचंद्र डिचवलकर, पुरळेकर मॅडम उपस्थित होते. आ. जयंत पाटील यांनी जिल्हा बँक शाखा कट्टा यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बँकेच्या व्यवहारात कशी वाढ होईल यासंदर्भात त्यांनी संचालक व्हिक्टर डान्टस व शाखा व्यवस्थापक लिंगायत यांच्यासोबत चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील जिल्हा बँक त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करीत आहेत. या बँकेच्या मंडळावर गेली 30 वर्षे त्यांची एकहाती बिनविरोध सत्ता आहे. महाराष्ट्र राज्यातील एक नंबरची जिल्हा बँक म्हणून रायगड जिल्हा बँक ओळखली जाते. तरी आपली बँक नंबर वन कशी राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.