माथेरानमध्ये स्वस्त सुरक्षित प्रवासाची हमी

पर्यटकांची ई रिक्षाला पसंती
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये नियमित येणार्‍या पर्यटकांना दस्तुरीपासून गावात येण्यासाठी वाहतुकीची जी काही अवाजवी खर्चिक बाब होती, त्यामुळेच अनेकांचा नेहमीच भ्रमनिरास होत होता. वयस्कर पर्यटक त्याचप्रमाणे बालगोपालांसह माथेरानमध्ये येताना स्वस्तात आणि सुरक्षित प्रवासाची हमी त्यांना उपलब्ध होत नव्हती. याच वाहतुकीच्या बाबतीत पर्यटकांना त्याचप्रमाणे स्थानिक व्यापारी वर्गासह नागरिकांना बदल हवा होता. तो ई रिक्षाच्या रूपाने संपुष्टात आल्याने वाहतुकीची उत्तम प्रकारे सुविधा निर्माण झाली आहे. तीन महिन्यांसाठी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू असला तरी सुद्धा हा असाच सुरू राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार माथेरानमध्ये या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कंपनीची ई रिक्षा तग धरू शकते याकरिता हा प्रोजेक्ट असून 5 मार्च रोजी या प्रोजेक्टला तीन महिने पूर्ण होणार आहेत. सर्वच स्तरातून या सुविधेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत असून शालेय विद्यार्थ्यांसह पालक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

सध्या तीन महिने कोणत्या कंपनीची ई रिक्षा चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकते यासाठी हा प्रोजेक्ट सुरु झाला आहे. त्यामुळे शालेय वेळ वगळता रात्री दहावाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध झाली आहे. ह्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ई रिक्षा सारखी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांनी माथेरानला अधिक पसंती दर्शवली आहे. हौशी पर्यटक हे घोड्यावरून रपेट मारताना दिसत आहेत. इथे येणारे पर्यटक हे खासकरून घोडेस्वारी करण्यासाठी येत असतात त्यामुळे ज्यांना घोड्यावरून प्रवास आवडतो ते घोड्यावरच बसून इथल्या निसर्गाचा आनंद घेणार आहेत.

एखादी नवीन बाब पुढील भविष्यासाठी लाभदायक असते त्यावेळी सुरुवातीला व्यावसायिक दृष्टीने आर्थिक झळ सोसावी लागणार यात शंकाच नाही परंतु भावी पिढीची आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जलदगतीने प्रगती होणे अपेक्षित आहे त्यामुळे होत असलेल्या नवीन बदलाचा सर्वानी स्वीकार केला पाहिजे तरच इथल्या स्थानिकांना व्यवसाय प्राप्त होऊ शकतो अन्यथा परिसरातील लोकांनी इथल्या प्रत्येक व्यवसायात आपले पाय घट्ट रोवलेले आहेतच त्यामुळे आगामी काळात स्थानिकांना हे खूपच डोईजड होऊ शकते.ई रिक्षाचा वापर पर्यटकांना मिळाल्यास इथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

Exit mobile version