| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कडून आधारभूत हमी भावाने भाताची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आपल्याकडील भाताची विक्री करण्यासाठी नेरळ केंद्रावर तब्बल 900 शेतकर्यांनी नोंदणी केली आहे.
शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन कडून शेतकर्यांच्या भाताची हमी भावाने आधारभूत किंमत देवून खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कर्जत तालुक्यातील तीन खरेदी केंद्र सुरू होणार असून त्यापैकी कर्जत येथील खरेदी विक्री संघामध्ये खरेदी केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. दुसरे केंद्र नेरळ येथे आज सुरू झाले असून नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कडून हे केंद्र सुरू झाले असून नेरळ केंद्रामध्ये आषणे कोषणे पासून कळंब पर्यंत शेतकरी यांच्या भाताची खरेदी केली जाते. त्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी करण्याची सूचना शेतकर्यांना केली होती, त्यानुसार नेरळ केंद्रासाठी तब्बल 900 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. त्यांच्या भाताची हमी भावाने खरेदी करण्याच्या केंद्राचे उद्घाटन शनिवारी 10 डिसेंबर रोजी नेरळ येथील शासकीय गोदाम येथे झाले. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांचे हस्ते विक्री साठी आलेल्या भाताचे वजन करून केंद्रातील भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
त्याप्रसंगी नेरळ विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र विरले, व्हाइस चेअरमन रविंद्र झांजे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र हजारे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सावळाराम जाधव, नारायण तरे, विष्णू कालेकर, शशिकांत मोहिते, यशवंत कराले, वैभव भगत, संजय शिंदे, धोंडू आखाडे, अर्चना शेळके, कुंदा सोनावळे आदी उपस्थित होते. तसेच शेतकरी यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.