मुरुडला अवतरला गुबूगुबू नंदीबैल

मालकासोबत गावोगावी भटकंती

| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |

गोल गोल चामड्याला, दांडकं हे घासतंय, बघ बघ सखे कसं, गुबूगुबू वाजतंय…. या लोकगीताची आठवण होईल, असे बोल वाजवित गुबूगुबू नंदीबैलवाले गावोगाव हजेरी लावताना दिसत आहेत. लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करताना दिसत आहेत. मंदीची झळ नंदीबैलालाही बसू लागली आहे.

पूर्वीच्या काळात करमणूक साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवे हवेशे वाटत. काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली. रेडिओ, टीव्ही आली, टेपरेकॉर्डर वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले, मोबाईल आला आणि लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होतोय, अशी स्थिती आहे.

बैल म्हणजे महादेवाचे वाहन, बैल हा शेतकर्‍यांचा सोबती. मात्र औद्योगिकीकरणाने हा बैलांची संख्या कमी होतेय. काळ कितीही बदलला तरी लहान मुलांना आजही नंदीचे आकर्षण आहे.

सुगीच्या हंगामापासून माघ महिन्यापर्यंत हे फिरस्ते गावोगाव फिरतात. नंदीबैल समाजातील महिला सुया, पिना, दाभण, दातवण, कुंकू, काळं मणी, कंकवा, फणी विक्री करतात. मात्र, बदलत्या काळानुरुप त्यांचा हा फिरता विक्री व्यवसाय आज संकटात सापडला आहे. केवळ नंदीबैल सोबत घेऊन हे फिरस्ते आपला उदरनिर्वाह करतात.

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?, शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय…? या बालगीताची आठवण करुन देणारा हा नंदीबैल सध्या मुरुड तालुक्यातील गावोगाव दिसू लागला आहे. नंदी बैलाला कोणाताही प्रश्‍न विचारला तरी तो मान डोलवून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो.

नंदी तुळजाभवानीचा आहे का? असे विचारल्यावर नाही नाही… असे मानेने सांगतो. नंदी गणपतीचा का? म्हंटल्यावर नकारार्थी मान हलवतो. नंदी महादेवाचा काय? असे विचारताच होकार देतो.

पुर्वी या खेळाला गल्लीत मानाचे स्थान होते. परंपरागत नंदी बैल व्यवसाय पूर्वीप्रमाणे राहिला नाही. भविष्य ऐकणारी पूर्वीची पिढी आता राहिली नाही. धान्य पूर्वीप्रमाणे जमत नाही. सुया, पिना, दातवण व्यवसाय तर बंदच झाला आहे. नवीन पिढीतील मुले या व्यवसायात येण्यास तयार नाहीत. चकट बैल धष्ट पुष्ट असल्याने व बैलाची मोठी शिंगे पाहून लोक थांबतात व खेळ पाहतात. बैंलची सुडोल प्रतिमा मालकाला पैसा मिळवून देते.

Exit mobile version