ग्रामसेवकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ; ग्रामस्थ आक्रमक
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीमधील गेल्या दोन वर्षांतील प्रशासक काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ॲड. मनोज ओव्हाळ यांनी केला केला आहे. यासंदर्भात माहितीसाठी मागितलेली कागदपत्र ग्रामसेवकांकडून देण्यास टाळाटाळ होत असल्याने बुधवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या मांडला होता.
कुरुळ ग्रामपंचायत ही प्रतिष्ठीती ग्रामपंचायत आहे. गेली दोन वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकराज आहे. मात्र, या दोन वर्षात प्रशासक राजवटीत भ्रष्टाचार होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याबाबत माहिती देताना ॲड. मनोज ओव्हाळ यांनी सांगितले की, 2 मे रोजीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचा जमाखर्च वाचण्यात आला. त्यात तफावत आढळून आली. गावातील एक रस्ता एका व्यक्तीने स्वखर्चातून केला होता; मात्र, या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे 2 लाख 67 हजार देयक कोणत्या आधारे अदा करण्यात आले आहे, याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना विचारणा केली असता सदर काम हे आपल्या काळात झालेले नाही. ते काम पूर्वी झालेले आहे. तसेच, ग्रामसभेत रेकॉर्ड दाखविण्याची तरतुद नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात पहाता येतील, असे आश्वासन दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले असता आपण पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त असल्याचे सांगून ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात आलेच नाही. त्यामुळे ग्रामसेवकांना जाणूनबुजून ग्रामस्थांना ही कागदपत्र दाखवायची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ओव्हाळ यांनी केला आहे. ही ग्रामनिधीची चोरी आहे. ग्रामपंचायतीसाठी चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी व त्याचा विनियोग याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. ग्रामनिधीबाबत भ्रष्टाचार झाला असून त्यातून ग्रामपंचायतीचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला जाब विचारण्यात येत असल्याचे ॲड. ओव्हाळ यांनी सांगितले. यावेळी रोशन चंद्रकांत भगत, माजी सरपंच ॲड. मनोज ओव्हाळ, माजी सदस्य अवधूत पाटील, माजी सदस्य उत्तम पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, सागर पाटील, गणेश पाटील, विनोद म्हात्रे, सुहास पाटील, नीलेश राणे उपस्थित होते.