| मुंबई | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षिकेच्या पतीने अत्याचार केल्याची घटना पूर्व उपनगरात घडली आहे. पीडित मुलगी अरबी भाषा शिकण्यासाठी आरोपीच्या पत्नीकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी गरोदर असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी 31 वर्षीय आरोपीला गुरूवारी पहाटे अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत पूर्व उपनगरात राहते. ती अरबी भाषा शिकण्यासाठी एका महिलेकडे जायची. तसेच पीडित मुलगी एक दिवस या महिलेच्या घरीही राहिली होती. त्याचा फायदा उलचून आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. डिसेंबर महिन्यात प्रथम हा प्रकार घडला. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तिला धमकावले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांतर पोलिसांनी मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला गुरूवारी पहाटे अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.