शेतकऱ्यांना जैविक खत निर्मितीबाबत मार्गदर्शन
। माणगाव । प्रतिनिधी ।
नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या दिशेने वाटचाल करत कालवण गावातील तरुण शेतकरी आणि शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैविक खत निर्मितीबाबत बुधवारी (दि.3) मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात कृषी अधिकारी निलेश डोके व प्रदीप बांगर यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जैविक खताची निर्मिती, त्याचा योग्य वापर, प्रसार आणि शेतीतील महत्त्व याबाबत सखोल माहिती देण्यात आली. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असताना, नैसर्गिक आणि जैविक शेती हा शाश्वत पर्याय ठरू शकतो, असे मत मार्गदर्शकांनी व्यक्त केले. तसेच, जैविक खतामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारते व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातील शेती अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याच अनुषंगाने कालवण येथील शेतकऱ्यांनी “काळभैरव शेतकरी गट, कालवण” या नावाने एकत्र येत सामूहिक शेती व नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेती विकासासाठी एक नवी दिशा मिळाली आहे. या प्रसंगी कालवण गावातील प्रगतशील शेतकरी रोहिदास महादेव हर्णेकर, रणजीत विठोबा हर्णेकर तसेच गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करण्याचा कालवण ग्रामस्थांचा हा प्रयत्न परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
