। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मधील नियोजित कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणार्या ऑनलाइन परीक्षेसंबंधी रायगड जिल्ह्याचे रहिवासी असणार्या अनुसूचीत जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), दिव्यांग (PWBD) आणि अनारक्षित (UR) गटांतील पात्र उमेदवारांना मार्गदर्शन लाभावे यादृष्टीने ‘भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम (Pre Recruitment Awareness Programme)’ दि. 2 ते 3 मार्च रोजी सकाळी 8.30 ते संध्या. 5.30 या दरम्यान आरसीएफ सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शेजारी सरखेल कान्होजी आंग्रेनगर (आरसीएफ वसाहत), कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमात कर्मचारी भरतीसंबंधी जाहिरात विविध वृत्तपत्रे तसेच आरसीएफचे संकेतस्थळ www.rcfltd.com या वर प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देऊन ऑनलाइन अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षेच्या स्वरूपासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आरसीएफ लिमिटेड, थळ युनिटतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ऑनलाइन परीक्षेच्या संदर्भातील मार्गदर्शनासोबत संबंधित विषयांच्या तज्ज्ञ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थित उमेदवारांना होईल. याव्यतिरिक्त स्पर्धात्मक परीक्षा विषयीचे खास तज्ज्ञ उमेदवारांना दोन दिवस विशेष प्रशिक्षण देतील.
सदरच्या भरती संबंधीत मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या इ-मेल आयडीवर कळविण्यात आले आहे. संबंधीत उमेदवारांनी सदरच्या ईमेल ची प्रत (हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी) तसेच आधार कार्ड (प्राधान्याने)/पॅन कार्ड/ड्रायविंग लायसेन्स ची छायाप्रत सोबत घेऊन त्यांना नेमून दिलेल्या वेळेत आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शेजारील सभागृहात उपस्थित रहावे आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.