| रायगड | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात मंगळवारी (दि.28) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विद्यमाने ज्येष्ठांना ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्याचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.
यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती तेजस्विनी निराळे व ॲड. कामटे यांनी सभागृहास ज्येष्ठांच्या कायद्यानबाबत उपयुक्त माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी पाल्यांची असते, परंतु, काही पाल्यांना वृद्ध व्यक्ती घरात असणे हे अडचणीचे वाटते. त्यांना आर्थिक सहाय्य करण्यास व पालनपोषण करण्यास जे पाल्य नकार देतात. त्यांच्यावर अधिनियम 2007 नुसार कार्यवाही करून फौजदारी प्रक्रिया सुरू करता येते. कायदेशीर रित्या त्यांना पोटगी देण्यास भाग पाडता येते. याबाबत सविस्तर माहिती उपस्थितीतांना देण्यात आली. तसेच, वृद्धांसाठी कल्याणकारी योजना व त्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती न्यायाधीश महोदया तेजस्विनी निराळे यांनी देऊन त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी उपस्थितांनी त्यांना प्रश्न विचारून सविस्तर माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संस्थेच्या उपाध्यक्ष चारुशीला कोरडे, सचिव नंदकुमार तळकर, खजिनदार प्रणिता वर्तक, द्वारकानाथ नाईक, आर. के. घरत, दिलीप शिंदे, मेघना कुलकर्णी, ज्योती पाटील, हेमंत राऊत, मनोहर सुर्वे, व शरद कोरडे यांच्यासह प्राधिकरणाकडील कर्मचारी अजय पाटील व नितल म्हात्रे उपस्थित होत्या.







