। कोर्लई । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी मुंबई येथील पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांच्या हस्ते प्रा. डॉ. जयपाल पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी आपल्या सुरक्षेसाठी कायम 108 बीव्हीजीचा वापर करावा, महिला डॉक्टरांनी महाराष्ट्र पोलीस 112 क्रमांकाचा वापर करावा, गावातील शेतकऱ्यांच्या मुलींना बाळंतपणात 102 रुग्ण वाहिकेचा वापर करण्यास सांगावे, घरातील गॅस, सिलेंडर, जेष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय रायगड विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण रायगडचे डॉ. साखरे व सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक, 85 डॉक्टर उपस्थित होते.





