कृषिदूतांचे कासू येथे बोर्डो मिश्रणाबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

खोपोली |  प्रतिनिधी |

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, आचळोली (ता. महाड) येथील बीएस्सी. कृषी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पेण तालुक्यातील कासू येथे शेतकऱ्याच्या शेतावर बोर्डो मिश्रण वापराबाबतचे प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कृषिदूत नितीश गणेश म्हात्रे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पिकावर पडणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण हे प्रभावी बुरशीनाशक आहे. १ टक्का तीव्रतेचे १०० लिटर बोर्डोमिश्रण तयार करण्यासाठी १ किलो मोरचुद आणि १ किलो कळीचा चुना लागतो.ते म्हणाले की,१ किलो मोरचुद फडक्यात बांधून ते एका प्लॅस्टिक ड्रममध्ये ५० लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून पूर्ण विरघळू द्यावे.प्लॅस्टिकच्या दुसऱ्या ड्रममध्ये १ किलो चुना भिजत ठेवावा.मोरचुदाचे तसेच चुन्याचे द्रावण काठीने ढवळून घ्यावे.ही दोन्ही द्रावणे १०० लिटर क्षमतेच्या तिसऱ्या ड्रममध्ये एकाचवेळी पण हळूहळू काठीने ढवळत ओतावे.तिसऱ्या ड्रममध्ये तयार झालेले आकाशी रंगाचे मिश्रण म्हणजेच बोर्डोमिश्रण, असे त्यांनी सांगितले.

कृषिदूत संदीप भगवान माने म्हणाले की, शुद्ध व दगड विरहित कळीचा चुना वापरून प्लॅस्टिक ड्रममध्ये अथवा बादलीत बोर्डोमिश्रण तयार करावे.मिसळताना द्रावणे थंड असावीत.बोर्डोमिश्रण जास्त काळ साठवून न ठेवता मोरचुद व चुना यांची द्रावणे वेगवेगळी ठेवावी.दोन्ही द्रावणे एकत्र मिसळून मिश्रणाच्या योग्यतेची काळजी घेऊन २४ तासाच्या आत फवारावे.फवारणी यंत्रात भरताना मिश्रण फडक्यातून गाळून घ्यावे व वापरलेली भांडी स्वच्छ धुवून ठेवावी.ते म्हणाले की,१ किलो मोरचुद,१ किलो कळीचा चुना व आवश्यकतेनुसार १० ते ३९ लिटर पाणी वापरून बोर्डोपेस्ट तयार करता येते. नारळ व सुपारीच्या खोडावरील डिंक्या रोग,लिंबावरील देवी रोग, आंब्यावरील पिंक रोग इ.च्या नियंत्रणासाठी बोर्डोपेस्ट वापरतात.रोगट भाग खरवडून किंवा रोगट फांद्या छाटलेल्या जागी तसेच खांद्यावरील जखमांवर बोर्डोपेस्टचा लेप ब्रशने दिल्यास बुरशीजन्य आणि सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते, असे त्यांनी सोप्या भाषेत समजवून सांगितले व या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी स्वतःहून करावा, असे आवाहन केले.

या प्रात्यक्षिकासाठी कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर,कार्यक्रम समन्वयक प्रा.व्ही. आर. पवार,कार्यक्रम अधिकारी अ. वि. महाजन,विषयतज्ज्ञ सु. फ. पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी निवडक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version