गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

| धर्मशाला | वृत्तसंस्था |

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या अंतिम सामन्यात थेट धडक मारली आहे. गुजरात टायटन्सला सर्व आघाड्यांवर चीतपट करताना आरसीबीने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मंगळवारी (दि.26) धर्मशालेत खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर 1 सामन्यात बंगळुरूने गुजरातवर 92 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता गुजरातला क्वालिफायर 2 मध्ये खेळावे लागणार आहे. एलिमिनेटरमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या विजेत्यांशी ते भिडतील.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने 43 धावा करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. यावेळी कोहली आणि देवदत्त पडिक्कल (30) यांनी 72 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर मधल्या फळीत रजत पाटीदारने फलंदाजीला येत संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला 254 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने 33 चेंडूंत नाबाद 93 धावा केल्या. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली. दोघांनी चौथ्या बळीसाठी 95 (45) धावांची भागीदारी केली. कृणाल 43 धावा करत बाद झाला. यावेळी रबाडा, होल्डर यांनी प्रत्येकी 2, तर प्रसिद्ध कृष्णाने 1 बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या गुजरातच्या फलंदाजांनी निराशा केली. साई सुदर्शन 14 धावांवर हिट विकेट पडला आणि गिलही 2 धावांवर त्रिफळाचीत झाला. यष्टीरक्षक जोस बटलरने 11 चेंडूंत 29 धावा केल्या. निशांत सिंधू 5 धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर 8 धावांवर बाद झाले. जेसन होल्डर तर शून्यावरच बाद झाला. संघ बिकट स्थितीत असताना राहुल तेवातियाने अर्धशतक झळकावून गुजरातचा धावफलत हलता ठेवला; मात्र, शेवटी गुजरातला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी बंगळूरूकडून वेगवान गोलंदाज जेकब डफीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तसेच, रसिक सलाम दार, कृणाल पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

जीवदान अन्‌‍ सर्वोच्च धावसंख्या
या सामन्यात गुजराजच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांचे क्षेत्ररक्षण ठरले. त्यांनी बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारला दोनदा जीवनदान दिले. 14 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर रजत 18 धावांवर असताना त्याचा झेल सोडला. त्यानंतर त्याच षटकातीलच तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा रजतला जीवनदान मिळाले. कगिसो रबाडाने रजतचा सोपा झेल सोडला आणि तेव्हा गिल खूपच चिडलेला दिसला. त्यानंतर रजतने अवघ्या 21 चेंडूंत अर्धशतक ठोकले. रजत पाटीदारने 33 चेंडूंत 5 चौकार व 9 षटकारांसह 93 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीने क्वालिफायर सामन्यात संघाला सर्वोच्च धावसंख्या उभारून दिली.
Exit mobile version