क्वालिफायर एकचे समिकरण बिघडले
| लखनऊ | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी (दि.22) झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला पराभूत केले. मिचेल मार्शच्या वादळी शतकाच्या जोरावर लखनऊने 235 धावांचा डोंगर उभा केला होता. गुजरातच्या सलामीवीरांनी यापूर्वी 200हून अधिक धावांचा पाठलाग करून दाखवला होता, परंतु, यावेळी ते अपयशी ठरले आहेत. गुजरात टायटन्सच्या या पराभवामुळे क्वालिफायर 1 मधील प्रवेश लांबणीवर पडला असून त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. तसे न झाल्यास पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना क्वालिफायर 1मधील जागा पक्की करण्याची संधी मिळाली आहे.
लखनऊने गुजरातसमोर 236 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. एडन मार्करम (36) व मिचेल मार्श यांच्या 91 धावांच्या सलामीनंतर निकोलस पूरनच्या फटकेबाजीने सर्वांचे मन जिंकले आहे. मार्शने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक अवघ्या 56 चेंडूत पुर्ण केले आहे. त्याने पूरनसोबत 51 चेंडूंत 121 धावांची भागीदारी केली. मार्श 117 धावांवर झेलबाद झाला. पूरन 56 धावांवर, तर रिषभ पंत 16 धावांवर नाबाद राहिला. या हंगामाच्या सुरुवातीला पंजाब किंग्सने मारलेल्या 243 धावांनंतर विरुद्ध ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
मागील सामन्यात साई सुदर्शन व शुभमन गिल या जोडीने गुजरातला एकही गडी न गमावता 205 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून दिला होता. परंतु, यावेळी ही जोडी शांत ठेवण्यात लखनऊला यश मिळाले आहे. साई सुदर्शन 21 धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिलही 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर 33 धावा करणाऱ्या जॉस बटलरचा देखील त्रिफळा उडाळा. बटलर बाद झाला तेव्हा गुजरातला 63 चेंडूंत 140 धावा करायच्या होत्या. मोहम्मद शाहरुख खान व शेर्फाने रुथरफोर्ड यांनी 28 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून गुजरातच्या आशा जीवंत ठेवल्या. त्यांना 30 चेंडूंत 70 धावा करायच्या होत्या. मात्र, 16व्या षटकात गुजरातची ही जोडी तोडण्यात लखनऊला यश आले. रुथरफोर्ड 38 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शाहरुखने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. राहुल तेवातिया 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर अर्शद खान (1) बाद झाल्यावर गुजरातला 12 चेंडूंत 43 धावा करायच्या होत्या. परंतु, त्याचवेळी शाहरुख 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांत गुजरातचे दोन गडी बाद झाल्याने गुजरातला 9 बाद 202 धावांवर रोखून लखनऊने 36 धावांनी विजय पक्का केला. त्यामुळे आता आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्या प्रत्येकी दोन लढती शिल्लक आहेत. या दोन्ही लढती जिंकून हे संघ प्रत्येकी 21 गुणांसह क्वालिफायर 1 साठी पात्र ठरतील. गुजरातला शेवटचा सासना जिंकूनही 20 गुणांपर्यंत पोहोचता येईल.
मिचेल मार्शचे विक्रमी शतक
64 चेंडू
117 धावा
10 चौकार
8 षटकार
मिचेल मार्शने यंदाच्या आयपीएलमधील सहावी 50पेक्षा अधीक धावांची खेळी केली आहे. त्याने राशीद खानच्या एका षटकात 6,4,6,4,4,1 अशा 25 धावा कुटल्या आहेत. एडन मार्करमसोबत त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीला 91 धावांची भागीदारी केली आणि गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मिचेल मार्शने वादळी शतक झळकावताना एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 2008 मध्ये त्याचा मोठा भाऊ शॉन मार्श याने आयपीएलमध्ये शतक झळकावले होते आणि आयपीएल इतिहासात शतक झळकावणारी ही भावांची पहिलीच जोडी ठरली आहे.