। गडचिरोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. शुक्रवारी (दि. 23) सकाळी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती गुरुवारी सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सी-60 कमांडो आणि सीआरपीएफ जवानांच्या 12 पथकांनी कवंडे आणि नेलगुंडा भागात सर्च मोहीम सुरू केली.
यानंतर शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी इंद्रावती नदीकाठाला घेराव घालण्यास सुरुवात केली असता नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. सुमारे दोन तास चाललेल्या या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरून एक स्वयंचलित सेल्फ-लोडिंग रायफल, दोन 303 रायफल, एक बंदूक, वॉकी-टॉकी सेट, कॅम्पिंग साहित्य आणि नक्षलवादी साहित्यासह अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.