कोकणच्या ‌‘हापूस‌’वर गुजरातचा डोळा

जीआय टॅगसाठीचा वाद न्यायालयात

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातला हापूस आंबा हा फक्त राज्यात किंवा देशातच नव्हे तर, संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगात सर्वांचा लाडका आणि कोकणसह महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या ‌‘हापूस‌’च्या भौगोलिक मानांकनावर गुजरातच्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. गुजरातने ‌‘वलसाड हापूस‌’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील हापूस उत्पादक आणि विक्रेते आक्रमक झाले आहेत. याविरोधात न्यायालयीन लढ्याचीही त्यांनी तयारी दर्शवली आहे.

कोकणातील हापूस आंब्याला यापूर्वीच जीआय टॅग मिळाला आहे. पण आता गुजरातमधील गांधीनगर व नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर कायदेशीर सुनावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे हापूस आंब्याला मिळालेले ‌‘कोकण हापूस‌’ हे जगातले पहिले जीआय मानांकन धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. भारतात 12 ते 15 आंबा प्रजातींना जीआय टॅग मिळाला आहे. यात महाराष्ट्रातील कोकणचा हापूस, मराठवाडा केसर, गुजरातचा गीर केसर, उत्तर प्रदेशचा मलिहाबादी दशेहरी, रतौल आंबा, गोव्याचा मानकुराद आंब्यांचा समावेश होतो.

‌‘वलसाड आंबा‌’ नावाने विका
गुजरातला ‌‘हापूस‌’चे मानांकन मिळू नये. त्यांनी त्यांच्या आंब्याला ‌‘वलसाड आंबा‌’ म्हणून विकावे. ‌‘कोकणचा हापूस‌’ हे मानांकन आमच्या शेतकऱ्यांसाठी अबाधित राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. गरज पडल्यास हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढायची कोकणी शेतकऱ्यांची तयारी आहे.
‌‘कोकण हापूस‌’ला पहिला जीआय टॅग
कोकण हापूसला 2008 मध्ये जीआय मानांकन मिळाले. येथील भौगोलिक परिस्थिती, माती आणि विशिष्ट चव (इसेन्स) यावर आधारित सर्व कागदपत्रे 2018 पर्यंत सादर करण्यात आली होती. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहभागातून कोकणाला हे मानांकन मिळाले आहे.
जीआय टॅग म्हणजे काय?
जीआय टॅगमुळे उत्पादनाला कायदेशीररीत्या विशिष्ट भौगोलिक ओळख मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातही उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. कोणालाही ते नाव वापरण्यास मनाई होते. जुलै 2025 पर्यंत भारतात 658 जीआय टॅग असलेली उत्पादने आहेत. यात 12 ते 15 आंब्यांचे प्रकारही आहेत. दार्जिलिंग चहा असा टॅग मिळवणारे पहिले उत्पादन आहे.
Exit mobile version