जिल्ह्यात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

। रायगड । वार्ताहर ।
जिल्ह्यात ठिकठिकणी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. उरण, पनवेल, नागोठणे, माणगावमध्ये गुरूपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

उरणमध्ये गुरु पूर्णिमा साजरी
उरण:
उरण परिसरातील मोरा कोळी वाडा, बोरी, केगाव, अंबिका वाडी, श्री स्वामी समर्थ मठ विनायक, तेलीपाडा, मुलेखंड आदी ठिकाणीसाई बाबा मंदिरात उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक कोळी वाडा येथील एक मुखी दत्त मंदिरात भजन महाआरती, पालखी उत्सव, महाप्रसाद आदींचे आयोजनक रण्यात आले होते हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला असे मंदिराचे मालक जगदीश कोळी यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा
पनवेल:
पनवेल तालुक्यासह सर्वदूर ख्याती असलेल्या शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे यंदा कोरोनाचे सावट टळल्याने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या मठात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी मठात गुरुपौर्णिमेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. बुधवारी सकाळी 5 वाजता काकड आरतीपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली.

नागोठण्यात गुरुपौर्णिमा साजरी
नागोठणे:
नागोठण्यातील खडकआळी भागातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली मठात सकाळपासूनच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. केंद्रातील गुरुपौर्णिमेची सुरुवात सकाळी सहा वाजता पूजा विधीने करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आले. याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक केंद्रात सकाळपासून रात्री पर्यंत दर्शन व सप्तशृंगी पाठाचे वाचन भक्तगणांकडून करण्यात आले. खडक आळीतील अध्यात्मिक विकास केंद्रातील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होण्यासाठी खडकआळी ग्रामस्थ व सर्व स्वामी सेवेकर्‍यांनी मेहनत घेतली.

हिरवळ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा
माणगाव:
हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या ज्युनिअर कॉलेज व कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थी परिषदे तर्फे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांकरिता गुरूपौर्णिमेच्या औचित्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ. संध्या कुलकर्णी उपस्थित होत्या. या कार्यक्रमअंतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यां करिता कविता, गायन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व गुरू याबद्दल आपली मते व्यक्त केली. महाविद्यालयाच्या डॉ. संध्या कुलकर्णी, प्रा. राकेश वडवळकर, प्रा. मनीषा बर्गे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर भाई धारिया, सोनाली धारिया, सुदेश कदम यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

व्ही.के. हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा
पनवेल:
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय, पनवेल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकूर , वरिष्ठ शिक्षक अनंत पाटील ,सुविद्या वावेकर सह सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरुवात तनुजा पाटणकर यांनी गुरुवंदनाने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व भाषणातून व्यक्त केले. एच.एन. पाटील यांनी गुरु शिष्याचे नाते कसे असावे याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच विद्यार्थ्यांमध्ये असणारे गुण व शिक्षकांमध्ये असणारी तळमळ याविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रंगनाथ नेरुरकर, तनुजा पाटणकर,नयना पाटील,मंगेश वारगुडे यांनी केले, तसेच सूत्रसंचलन रूपाली तरकसे यांनी केले.

Exit mobile version