खुलेआम केली जातेय गुटखा विक्री; प्रशासनाचे दुर्लक्ष
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रात खरोखर गुटखा विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांमध्येही सर्रासपणे गुटखा विक्री केली जात असूनही त्याविरोधात अन्न व औषधे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात जुलै 2012 मध्ये गुटखाबंदी लागू करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. गुटख्यामुळे अनेकांना तोंडाचा कर्करोग होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांनी गुटख्यापासून दूर राहावे यासाठी शासनाकडून जनजागृती केली जात आहे. तरीही सर्रासपणे उरण, पनवेलमधील शहरी भागासह ग्रामीण भागातील टपर्या व दुकानांवरही सर्रास खुलेआम गुटखा विक्री जोरात सुरू आहे. या ठिकाणी दुप्पट, तीनपट वाढीव किमतीला गुटखा विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागापुढे गुटखा विक्री रोखणे आव्हान ठरत आहे. गुटखा विक्रेत्यांनी किराणा दुकान, पानपट्टी व शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात दुकाने थाटली असून, सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. गुटखा खाऊन रस्ते, शासकीय कार्यालय, चौक, बसस्थानक, वर्दळीच्या ठिकाणी थुंकून परिसर अस्वच्छ केला जातो.
अन्न व औषध प्रशासन हतबल
अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईपासून सामान्य विक्रेत्यांना गुटखा पुरवणारे मात्र लांबच आहेत. परजिल्ह्यातून गुटखा मागवून ते विक्रेत्यांना पुरवणारे कारवाईपासून बचावलेले आहेत. कारवाई फक्त सामान्य विक्रेत्यांवर केली जात असल्याने गुटखा वितरीत करणार्यांना पकडण्याचे मोठे आव्हान अन्न व औषध प्रशासनावर आहे.
दुप्पट, तिप्पट किंमत
टपर्या व दुकानदार गुटख्याची मागणी करताच विमल गुटख्याची पाच रुपये किमतीची पुडी 10 रुपयाला, तर काही कंपन्यांच्या गुटख्याची सात रुपये किमतीची पुडी 30 रुपयांना विकत आहेत. इतर वेळेस घासाघीस करणारे ग्राहक गुटखा विकत घेताना मात्र कोणतीही तक्रार करताना दिसत नाही.
परराज्यातून पुरवठा
परराज्यातून चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक सुरू आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे गुजरातहून आणलेल्या गुटख्याची महामार्गालगतच्या गोदामात साठवणूक करून रात्रीच टपर्या व दुकानदारांना विकला जातो. तर, ग्रामीण भागात विक्रेत्यांच्या सहाय्याने पाठविला जातो.
पोलिसांचे सहकार्य?
खुलेआम गुटखा विक्री करणार्यांवर पोलिसांची कोणतीही दहशत नसल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांना या गुटखा विक्रीबाबत विचारले असता, गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करणे आमचे काम नाही, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे, असे सांगण्यात येते.पोलिसांच्या या भूमिकेमागे मोठे अर्थकारण असल्याचे सांगितले जाते.