अवैध धंद्यांकडे पोलिसांची जाणीवपूर्वक पाठ?
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरामध्ये आणि तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध धंद्यांना ऊत आला आहे. मटका आणि गुटखा हा गल्लोगल्ली मिळत आहेत. पोलिसांकडून थातूरमातूर कारवाया करून यातील बड्या व्यावसायिकांना क्लीन चिट दिली जात आहे. पोलिसांकडून अशा अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जात आहे.
ऐतिहासिक महाड शहर ही राजे छ. शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पद्स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राजकीय, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत. ऐतिहासिक चवदारतळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवान करण्यासाठी येत असतात. प्रतिवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्षे खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत. यात आता भर पडली असून, मटक्याबरोबरच गुटखादेखील मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे. ठिकठिकाणी बेकायदेशीर गुटखा विक्री होत असून, पोलिसांकडून छोट्या- छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत थातुरमातुर कारवाई केली जाते.
मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर दिसू लागली आहेत. महाड शहरात नवीन येणार्या अधिकार्यांकडून तात्पुरती धमक दाखवत हे व्यवसाय काही दिवसांकरिता बंद ठेवले जातात. मात्र, आर्थिक चर्चा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात हे व्यवसाय पुन्हा सुरु केले जातात. या बेकायदा व्यवसायाला राजकीय पाठबळदेखील लाभत आहे. राजकीय नेत्यांनी बंद म्हटले की, हे व्यवसाय बंद आणि सुरु करा म्हटले की सुरु अशी परिस्थिती महाडमध्ये सुरु आहे.
सध्या गल्लोगली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु झाली आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. शहरातील छ. शिवाजी चौक परिसरालादेखील या व्यवसायाने वेढा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते, नातेखिंड, महामार्ग याठिकाणी टपर्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील जनता, आदिवासी, तरुण मुले झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मटका आणि ऑनलाईन लॉटरीकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोटाची भूक भाग्वण्यासाठी धडपड करत असलेले आदिवासी या मटका दुकानांचे बळी ठरत आहेत. दिवसभर मेहनत करून कमावणारे आपले पैसे मटक्यावर उधळत असल्याने अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत.
मटका व्यवसाय जसा जोमाने सुरू आहे, त्याच पद्धतीत महाड तालुक्यात गुटखा विक्रीदेखील तेजीत आहे. परराज्यातून येणार्या गुटख्याची महाड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. यामध्येदेखील बडे लोक असल्याने पोलीस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. टपरीपर्यंत पुरवठा करणार्या लोकांवर थातुरमातुर कारवाई करून पुरवठा करणार्या बड्या धेंडांना एक प्रकारे सूट दिली जात आहे. यामुळे हा व्यवसायदेखील तेजीत असल्याचे ठिकठिकाणी पडलेल्या गुटख्याच्या पाकिटांवरून दिसून येत आहे.