सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग-रेवदंडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणार्या मुख्य रस्त्यावरील कुरुळ गावाच्या पुढील गिरोबा मंदिर परिसरात असणार्या दोन मोर्यांचे संरक्षक कठडे गायब झाले असून, रस्त्याची साईडपट्टीही खचली आहे. परंतु, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता अपघातास निमंत्रण बनला आहे. याठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. तरी, मोर्यांची दुरुस्ती करुन संरक्षक कठडे तात्काळ बसवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.
अलिबागपासून चार किलोमीटर अंतरावर कुरुळ गाव आहे. या गावाच्या पुढील रस्त्यावर गिरोबा मंदिर परिसरात असणार्या मोर्यांचे कठडे गायब झाले असून, येथील रस्त्याची साईडपट्टीही खचली आहे. या मोर्यांचे संरक्षक कठडे तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी मागील वर्षभरात अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून, एक ट्रक खाडीत कोसळल्याची घटनाही घडली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या रस्त्यावरून मुरुड, रोहा, नागाव, रेवदंडाकडे जाणार्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. विशेषत: नागाव, मुरुडला पर्यटनासाठी जाणार्या पर्यटकांची संख्या शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठी आहे. शिवाय, एचपी गेल कंपनीच्या गॅस सिलिंडर भरुन जाणार्या वाहनांचीही रात्री जास्त वर्दळ असते. या रस्त्यावर पथदिव्यांची सोय नाही, त्यामुळे रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, शिवाय याठिकाणी मोर्यांना संरक्षक कठडे नसल्याचे जवळ येईपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे मोर्यांवरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता जे.ई.सुखदेवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, बेलकडे-रोहा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामातच संबंधित मोर्यांचे कठडे व साईडपट्टी भरण्याचे काम करण्यात येईल.