| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकाप आ. जयंत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे वरसोली, ता.अलिबाग येथील मंजूर झालेल्या जेट्टी, पोचरस्ता आदी कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार अलिबागचे आ. महेंद्र दळवींच्या माध्यमातून सुरु असल्याने वरसोली ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. फुकटचे श्रेय लाटू नका, असा सल्ला वरसोलीचे शेकाप नेते सुरेश घरत यांनी दिला आहे.

वरसोली येथील समुद्रकिनारी ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा बांधला जावा, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी 6 ऑगस्ट 2021 रोजी मेरीटाईम बोर्डाकडे लेखी स्वरुपात केली होती. त्या पत्राची दखल घेत मेरीटाईम बोर्डाने 24 ऑगस्ट 2021 रोजी आ. जयंत पाटील यांना पत्र पाठवून एमआयएस 0215-प्र.क्र.64- बंदरे, 2 दि.21 मे 2015 च्या अद्यादेशानुसार सागरी धूपप्रतिबंधक उपाययोजनेची बांधकामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत असल्याचे नमूद केलेले आहे.
मेरीटाईम बोर्डाने आ. जयंत पाटील यांना पाठवलेले हेच ते पत्र

याचाच अर्थ आ. जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वरसोली येथील बंधार्याचे काम सुरु झाले असाच होता. मात्र वरसोलीच्या बंधार्यासाठी 100 कोटींचा निधी आपल्याच प्रयत्नाने मंजूर झाल्याचा दावा आ. महेंद्र दळवी यांनी केला आहे. या कामाचेही फुकटचे श्रेय लाटण्याचा त्यांचा सुरु असलेला प्रयत्न वरसोली ग्रामस्थांनी खोडून काढला आहे. याबाबत सोशल मिडियावरून वरसोलीची कामे आपणच केली असल्याचा खोटा गवगवा सुरु केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
सातत्याने पाठपुरावा
आ. जयंत पाटील यांनी केवळ याच नव्हे तर मागील अधिवेशनातही याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन सरकारला जाब विचारला होता. शिवाय त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली असतानाही त्यांनी वरसोली किनार्याची पाहणी करुन योग्य त्या सुचना केल्या होत्या. शिवाय कोळी बांधवांचे म्हणणे देखील ऐकून घेतले होते. अशी माहिती सुरेश घरत यांनी कृषीवलशी बोलताना दिली. असे असतानाही कोणत्याही प्रकारचे काम न करता दुसर्याच्या कामाचे श्रेय विद्यमान लोकप्रतिनिधींनी घेऊ नये, असा टोलाही घरत यांनी यावेळी लगावला.

