व्यायामशाळा वादाच्या भोवर्‍यात

शेडाशीचे भाजप सरपंचाचा प्रताप उघड
निलेश जाधव यांच्या लढ्याला यश

| पेण | प्रतिनिधी |
शेडाशी, ता.पेण येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत भाजप सरपंच प्रकाश कदम आणि ग्रामसेवकाने नियमाचे उल्लंघन करीत निर्माण केलेली सार्वजनिक व्यायामशाळा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. याबाबतचे बिंग फोडण्यात ग्रामस्थ निलेश दगडू जाधव यांना यश आले आहे. तसेच सरकारी आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे ठपका ठेवत प्रशासकीय कारवाई करण्याची विनंती सहायक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई होऊन दोघांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तळदेवचे रहिवासी निलेश दगडू जाधव यांनी नोव्हेंबर महिन्यापासून शेडाशी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच प्रकाश कदम आणि ग्रामसेवक एकनाथ दाताळी हे संगनमताने मनमानी कारभार करत आहेत. विकास कामे एका गावात मंजूर तर प्रत्यक्षात त्याची कामे दुसर्‍या ठिकाणी सुरु असल्याचे निदर्शनास आणले होते.याबाबतची तक्रारही निलेश जाधव यांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरुपात केली होती.

यामध्ये माळदेव बौध्दवाडी या दलित वस्ती करीता 7 लाखाची खुली व्यायाम शाळा साहित्य मंजुर झाली होती. या मंजुरीनुसार क्रिडा अधिकारी रायगड जिल्हा यांच्या मान्यतेने ठेकेदाराने 7 लाखाचे साहित्य शेडाशी सरपंचाकडे सुपूर्द केले. मात्र, त्यानंतर ग्रामसेवक व सरपंचाने ग्रामपंचायतीतील सदस्यांची दिशाभूल करून माळदेव बौध्दवाडीसाठी आलेले साहित्य माळदेव बौध्दवाडीसाठी न वापरता सरपंच प्रकाश कदम यांनी राजकीय पदाचा दुरपयोग करून स्वतःच्या मायणी तळदेव, ढेण गावात बसवून घेतले आहे. यामुळे कळत नकळत दलित बांधवांवर अन्याय झाला . दलित बांधवांच्या हक्काच्या व्यायाम शाळेचे साहित्य दुसरीकडे नेण्याचा गुन्हा सरपंचानी केला असल्याचे जाधव यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या बाबत 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास समाज कल्याण निरीक्षक अंकुश पोल ,विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे,क्रीडाधिकारी सचिन निकम, सहायक आयुक्त समाजकल्याण सुनिल जाधव यांनी संयुक्त पाहणी केली.या पाहणीत अनुसुचित जातीची मालदेव ही वस्ती मायणी गावाच्या एका बाजुस आणि मायणी गावाच्या दुसर्‍या बाजुस मालदेव वस्तीपासून साधारण दीड किमीच्या दरम्यान इतर वस्तीमध्ये व्यायामाचे साहित्य खुल्या ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये बसविण्यात आले असल्याचे सरपंच प्रकाश कदम, सरपंच आणि ग्रामसेवक एकनाथ दाताळी यांनी प्रत्यक्ष दाखविले होते.

मालदेव बौध्दवाडा येथे खुली व्यायामशाळेकरिता सन 2019-20 मध्ये अनुसूचित जाती उपायोजनेअंतर्गत पुरविण्यात आलेले साहित्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील वस्तीमध्ये बसविणेकरिता मंजुर करण्यात आलेले होते. परंतु सदर खुली व्यायामशाळेकरिताचे साहित्य अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये न बसविता अनुसूचित जातीच्या वस्तीपासून 1.5 किमी अंतरावर इतर वस्तीमध्ये बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनुसूचित जातीच्या वस्तीमधील लोकांना सदर खुल्या व्यायाम शाळेचा उपयोग होत नाही. अशा प्रकारचा पाहणी अहवाल अधिकार्‍यांने दिल्याने 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड यांनी सदरील सरपंच प्रकाश कदम व ग्रामसेवक एकनाथ दाताळी यांच्या विरुध्द आदेशाचे उल्लघन केले असल्याचे ठपका ठेवत प्रशासकीय कारवाई करण्याची विनंती सहायक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे एकंदरीत ग्रामसेवक आणि सरपंच याच्या विरुध्द कायदेशीर कारवाई होउन दोघांवर देखील निलंबणाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exit mobile version