जि.प.सीईओंकडे तक्रार दाखल
| पेण | प्रतिनिधी |
शेडाशी ग्रामपंचायतच्या हद्दीतील तळदेव गावचा रहिवासी निलेश दगडू जाधव याने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे शेडाशी सरपंच प्रकाश कदम व ग्रामसेवक यांच्या विरुध्द निवेदनाद्वारे तक्रार करून अॅट्रॅासिटी दाखल करण्याची व 39 (1) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेडाशी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक मनमानी कारभार करत आहेत. विकासकामे एका गावात मंजूर तर प्रत्यक्षात कामे करणे दुसर्या गावात असाच प्रकार सुरू असल्याचे निलेश जाधव यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. माळदेव बौध्दवाडी या दलितवस्ती करीता 7 लाखांचा निधी खुल्या व्यायामशाळेच्या साहित्यासाठी मंजूर झाला होता. क्रीडाा अधिकारी रायगड जिल्हा यांच्या मान्यतेने ठेकेदाराने 7 लाखाचे साहित्य शेडाशी सरपंचाकडे सुपूर्दही केले. मात्र, त्यानंतर ग्रामसेवक व सरपंचाने ग्रामपंचायतीतील सदस्यांची दिशाभूल करून माळदेव बौध्दवाडीसाठी आलेले साहित्य माळदेव बौध्दवाडीसाठी न वापरता प्रकाश कदम यांनी राजकीय पदाचा दुरपयोग करून स्वतःच्या मायणी तळदेव, ढेण गावात बसवून घेतले आहे. यामुळे कळत-नकळत दलित बांधवांवर अन्याय झालाअसल्याचे या तक्रारी नमूद करण्यात आले आहे.
दलित बांधवांच्या हक्काच्या व्यायाम शाळेचे साहित्य दुसरीकडे नेण्याचा गुन्हा सरपंचानी केला आहे. महत्वाची बाब म्हणजे सदरील माहिती निलेश जाधव यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार मागणी करूनही सरपंच व ग्रामसेवकांनी माहिती दिली नाही. अपिल केल्यानंतरही गटविकास अधिकार्यांनी सांगून देखील माहिती चुकीची पुरविली. तेव्हा मात्र निलेश जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे धाव घेतली. योग्य प्रकारे चौकशी न झाल्यास 1 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्षाच्या आगमनाच्या दिवशी निलेश जाधव हे जिल्हा परिषद कार्यालय, रायगड येथे आमरण उपोषणास बसणार आहेत असेही या निवेदनातून सुचित करण्यात आले आहे.
या तक्रारी अर्जाचा धसका घेऊन शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पेण पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे यांनी शेडाशी ग्रामपंचायतीला भेट देत सत्यस्थिती काय आहे हे पाहिले आहे. या संदर्भात प्रसाद म्हात्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 18 डिसेंबरपर्यंत मला आचारसंहिता प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. निवडणुका होताच मी माझा रिपोर्ट वरिष्ठांना कळविणार आहे. प्रथमदर्शी तरी व्यायाम शाळेचे साहित्य तक्रार दाराप्रमाणे दुसर्या जागेवर आहेत असे त्यांनी मान्य केले.