। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी व आर्थिकदृष्टया संपन्न असलेली ग्रामपंचायत म्हणजे डोलवी ग्रामपंचायत. डोलवी ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे तालुक्यासह जिल्हयाचे आकर्षण असलेली निवडणूक. यावेळेला दोन राजकारणातील मातब्बर घराणे आमने-सामने आले आहेत. तर तरुणांच्या प्रोत्साहाने कविश पाटीलसारखा नवखा उमेदवार डोलवी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या आखाडयात शंडू ठोकून उभा राहिला आहे.
डोलवी ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभाग असून सरपंच व्यतिरिक्त नऊ सदस्यांसाठी निवडणूक रंगणार आहे. थेट सरपंचासाठी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. कॉग्रेसकडून परशूराम म्हात्रे, तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय जांभळे यांचे चिरंजीव प्रथमेश जांभळे आणि यंगीस्थानच्या मदतीने वारकरी सांप्रदयातील कविश पाटील अशी लढत पहायला मिळणार आहे.
परशूराम म्हात्रे यांच्या मागे राजकीय घराण्याची पुण्याई आहे. स्वतः परशूराम म्हात्रे हे 20 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आहेत. तर त्यांचे चुलते जिल्हा परिषदेचे माजी सभापती, आजोबा पेण पंचायत समितीचे माजी सभापती, तर प्रथमेश जांभळे हे तरुण उमेदवार असून त्यांना राजकीय अनुभव नसले तरी वडील व आई दोघे ही जिल्हा परिषदचे माजी सदस्य होते. काही काळ वडीलांकडे जिल्हयाच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. म्हणजेच संजय जांभळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती होते. या दोन घराण्याच्या मानाने कविश हा राजकारणातील नवखा व राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आहे. परंतु रथी महारथींच्या समोर कविश याने तगडे आव्हान उभे केले असून कविश पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठया प्रमाणात तरुण वर्ग सहभागी होत आहे.
म्हात्रे व जांभळे यांचा विचार करता हे दोन्ही उमेदवार राजकारणातील बडे पेहलवान आहेत. परंतु, सतत खुर्चीच्या हव्व्यासामुळे या दोन्ही उमेदवारांकडे तरुण वर्गांनी पाठ फिरवली आहे. तर कविश हा मीतभाषी व सर्वसामान्यांना मानणारा व सर्वसामान्यांचा आदर करणारा उमेदवार आहे. त्यामुळेच त्याच्या विजयाच्या वाटा सुखकर होताना दिसत आहेत. यामुळेच इतर दोन उमेदवारांनी धसका घेउन आदिवासी बांधवांना मतदानाच्या अगोदर देवदर्शनासाठी नेण्याचा घाट घातल्याची चर्चा डोलवी परिसरात जोर धरत आहे.
एकंदरीत कविश पाटील यांनी राजकीय परिपक्वता असलेल्या उमेदवारांना आताच्या स्थितीला तरी घाम फोडला आहे. कविश पाटलांच्या सोबत अधिकृत राजकीय पक्षांचा पाठबळ नसला तरी शेकाप, शिवसेना ठाकरे गट, भाजप, बंडखोर कॉग्रेस तथा राष्ट्रवादीचे तरुण मोठया संख्येने प्रचार फेर्यांमध्ये सहभागी होत आहेत.
कृषीवलशी बोलताना कविश यांनी सांगितले की, मी वारकरी सांप्रदयाचा असून राजकारणातले चढ-उतार मला माहित नाहीत. मात्र एवढ नक्की की मी पुर्ण इच्छेनी गावातील प्रास्थापित राजकीय मंडळीला सत्त्येच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी निवडण्ाू रिंगणात उतरलेलो आहे. 20-20 वर्ष सत्तेचा उपभोग घेउनही पाण्यासारखा मुलभुत प्रश्न ही मंडळी सोडवू शकली नाही. म्हणूनच डोलवी गावातील महिलांच्या दारापर्यंत मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वैज्ञानिक युगात खार्या पाण्याचे गोडे पाणी करण्याचे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे.
आर्थिकदृष्टया संपन्न असलेल्या ग्रामपंचायतीने जर गावाच्या भोवती अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास मुबलक पाणी पुरवठा होईल. त्याचप्रमाणे सौर उर्जेचा वापर करून गावाला मुबलक वीज पुरवठा करता येईल व उरलेली वीज महावितरण कंपनीला विकता देखील येईल. परंतु, वर्षानुवर्षे राजकारण करणार्या मंडळींजवळ ती इच्छाशक्ती नाही. निर्माण होणार्या प्रश्नावर उत्तर शोधल्यास गावाचा विकास हा अटळ आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे गाव दोन तुकडयात विभागला गेला आहे. गावाला पुन्हा जोडायचे असेल तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे. स्थानिक तरुणांना कंपनीत समाविष्ट करण्यासाठी जे विरोधकांनी केले नाही ते मी करून तरुण वर्गाला रोजगार उपग्ब्ध करून देईन, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत डोलवी गावची तिरंगी लढत साम, दाम, दंड, भेद नितीचा अवलंबन करणारी आपल्याला पहायला मिळेल.
माझ्या विरोधी उमेदवारांनी भले मोठे जाहिरनामे व वचननामे काढले आहेत. परंतु मी एवढच सांगू शकतो की मी निवडून आल्यास पाणी, विज आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावर उड्डाणपुल या तीन बाबींना सर्वात जास्त प्राधान्य देईन. इतर विकासकामे तर होतच राहतात. परंतु माझ्या दृष्टीने पाणी, वीज, रस्ता हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या 20 तारखेला डोलवी ग्रामपंचायतीच्या मतपेटीत आपल्याला निश्चित बदल दिसेल. हा माझा ठाम आत्मविश्वास आहे. – कविश पाटील, थेट सरपंच उमेदवार, डोलवी
देवदर्शनाला जाण्यासाठी आदिवासी बांधवांवर दबाव
डोलवी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा दिवस जवळ येत आहे तस तसे प्रचार यंत्रण शिगेला पोहोचली आहेत. प्रस्तापित राजकीय मंडळीने आदिवासी बांधवांची मते आपल्यालाच मिळावी म्हणून त्यांना देवदर्शनाला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा डोलवीसह तालुक्यात जोर धरत आहेत.या बाबीकडे निवडणूक आचार संहिता प्रमुख प्रसाद म्हात्रे यांनी अर्वजुन लक्ष दयावे.