| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील विविध भागात चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. याबाबत नेरळ पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना मंगळसूत्र चोरी आणि सोन्याच्या चैन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून तब्बल 12 गुन्ह्यांची उकल केली आहे.
नेरळमधील अंबिका नाका येथे दि.30 मार्च रोजी दुपारच्या सुमारास पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्र चोरट्याने मोटारसायकलवरून येऊन जबरीने हिसकावून नेले. या घटनेची नोंद झाल्यावर नेरळच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे या चोरट्यापर्यंत पोहचले. प्रविण पाटील (41) असे सराईत चोरट्याचे नाव असून, तो शेलू येथील वाटिका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. तसेच, त्याच्याकडून 10 ग्रॅमची सोन्याची चेन व 10 ग्रॅमचे मंगळसूत्र असे अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे सोने ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर बदलापूर, कोनगाव, मुंब्रा, बडनेरा पोलीस ठाण्यात जबरी चोरी, चोरी असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी अन्य काही गुन्ह्यांची उकल देखील होण्याची शक्यता आहे. या तपासाबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण टीमचे अभिनंदन केले आहे.
सराईत चोरट्याला अटक
