दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार गजाआड

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. चेतन कातकर (34) असे त्याचे नाव असून, त्याने कामोठे व कळंबोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील केलेले एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याच्याकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निहार पाल (23) या तरुणाने खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये त्याची दुचाकी पार्क केली होती. ती चोरट्याने चोरून नेली होती. निहार सायंकाळी परत आल्यानंतर त्याला दुचाकी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर त्याने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात त्यांना आढळलेला संशयिताचा फोटो त्यांनी येथील गॅरेज चालक, पार्किंग कर्मचारी व इतरांना दाखवण्यात आला होता. त्याच्या चार दिवसांनंतर तो पुन्हा खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Exit mobile version