| पनवेल | वार्ताहर |
हार्बर रेल्वे मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकालगत आग लागल्यामुळे 42 दुचाकी वाहने आगीत जळून खाक झाल्याची घटना घडल्यानंतर कामोठे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या दुचाकी जळीतकांडामागील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली असली तरी पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. त्यामुळे या दुचाकी जळीतकांडामागचे गूढ अद्याप कायम आहे.
मानसरोवर रेल्वे स्थानका लगतच्या ज्या भागातील दुचाकींना आग लागली, त्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. आगीचे निमित्त होऊन मानसरोवर रेल्वे स्थानका लगतच्या भागात उभ्या असलेल्या 42 दुचाकींनी एकामागोमाग एक पेट घेतला. यातील 34 पूर्ण तर 8 दुचाकी अर्धवट जाळल्या आहेत. आगीच्या घटनेनंतर त्याठिकाणी दुचाकीचा सांगाडा पडला होता. त्यामुळे नेमकी आपली दुचाकी कोणती? असा प्रश्न प्रत्येक दुचाकी चालकाला पडला होता. सदर प्रकार पाहून पोलीसदेखील हैराण झाले होते. नेमकी सदर आग कोणी लावली की लागली? याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास करण्यात येत होता. सुरुवातीला कामोठे पोलिसांनी अकस्मात जळीत म्हणून या घटनेची नोंद केली होती. मात्र, नंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु केला आहे.