मालिकांमधील कलाकारांची राहणार उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कृषीवलतर्फे खास महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन उद्या मंगळवारी (दि.16) रोजी पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा जपण्यात आली आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या मालिकेतील पाच सिनेतारका आकर्षण ठरणार आहेत.
हळदीकुंकू म्हणजे प्रत्येक महिलांसाठी मानाचा दिवस मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून कृषीवलने महिलांचा हा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू समारंभ गेल्या अनेक वर्षांपासून अलिबागमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्तरातील आठ हजारांहून अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवितात. यंदादेखील महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हळदीकुंकूचा समारंभ 16 जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सात यावेळेत साजरा होणार आहे. यावर्षीदेखील कार्यक्रमाच्यावेळी पाच सिनेतारकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील चेतना भट आणि रसिका वेंगुर्लेकर, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील यामिनी म्हणजे अभिनेत्री दीप्ती केतकर आणि मयूरी म्हणजे अभिनेत्री जान्हवी तांबट, ‘राणी मी होणार’ मालिकेतील मीरा म्हणजे अभिनेत्री संचिता कुळकर्णी, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेतील बयो म्हणजे अभिनेत्री विजया बाबर यांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.