| चिरनेर | वार्ताहर |
वाळवीग्रस्त भागातील हनुमान कोळीवाड्याचे फेरपुनर्वसन करण्यात प्रशासन आणि जेएनपीटी चालढकलपणा करत असल्यामुळे संतापलेल्या हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी बाड बिस्तार्यासह जुन्या गावावर कब्जा केला आहे. रविवारपासून हे ग्रामस्थ जुन्या शेवा कोळीवाडा गावात राहण्यास आले असून, अद्यापपर्यंत प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आला नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जेएनपीटीने 1986 साली शेवा कोळीवाडा हे गाव विस्थापित करून त्यांचे उरणजवळ बोरी पाखडी येथे पुनर्वसन केले. मात्र, वाळवी आणि दलदल असलेल्या जागेत पुनर्वसन केल्यामुळे अल्पावधीतच या गावातील घरांना वाळवीने पोखरले. त्यामुळे संपूर्ण गावातील घरे वाळवीग्रस्त झाली असून, गावातील मोठमोठी घरे कोसळल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे आमचे फेरपुनर्वसन करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
जेएनपीटी प्रशासनाने हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी फुंडे गावाजवळील 10.5 हेक्टर जागादेखील निश्चित करून पुनर्वस्नाची रक्कम सिडकोकडे अदा केली आहे. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे आणि आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या हाती काहीही लागले नसल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दोन वेळा जेएनपीटी बंदरात येणारी जहाजेदेखील अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याबाबत काही कारवाई झाली नसल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी रविवारी आपल्या मूळ गावी म्हणजे जुन्या शेवा कोळीवाड्यात बस्तान मांडले. आता आम्हाला तुमचा कोणताही भूखंड नको व पुनर्वसन नको आम्ही आमच्या मूळ गावातच राहणार, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सध्या हे ग्रामस्थ या जुन्या गावातच भजन, कीर्तन करत लोकांना उत्तेजन देण्याचे काम करत आहेत.
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी आता जुन्या गावातच राहण्याचा निर्धार केला असून, गावातील 95 टक्के ग्रामस्थ सध्या जुन्या गावात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. दोन-तीन दिवस शासनाच्या निर्णयाची वाट बघून नंतर मग या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने जागा समांतर करून रस्ता बनविण्यास सुरुवात केली जाईल. पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिल्लक असलेले स्थानिकांचे सात कोटी रक्कम देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ती रक्कम जुन्या गावाच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
सुरेश कोळी
अध्यक्ष, ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा