आनंदाचा शिधा म्हणजे वरातीमागून घोडे

| पेण | प्रतिनिधी |

गुढीपाडवा, गणपती आणि आता दिपावली पेणकरांना आनंदाचा शिधा हा उशिराच पोहोचतो. पेण तालुक्यात शहर वगळता ग्रामीण भागात आनंदाचा शिधा आज दिपावलीचा चौथा दिवस उजाडला तरी पोहोचलाच नाही. याविषयी पेण तालुका पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार सुरेश थळे यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते स्वतःच आपल्या कार्यालयात हजर नसल्याचे आढळून आले.

पेण तालुक्यात 65 ग्रामपंचायती असून, यामध्ये आनंदाच्या शिध्याचे वाटप आजतागायत झाले नाही. फक्त चमकोगिरी करण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी शहरातील रास्त दुकानदारांना आनंदाचा शिधा वाटप करण्यास सांगितल्याचे बोलले जाते. जर शहरात माणसं राहात असतील, तर ग्रामीण भागात जनावरं राहतात का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहेत. शहरात राहणाऱ्यांकडे गरिबी आहे, ग्रामीण भागात राहणाऱ्यांकडे गरिबी नाही का, हा दुजाभाव पुरवठा अधिकारी सुरेश थळे का करतात. शहरातील रास्त भाव दुकानदारांवर थळे मेहरबान का आहेत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

शासनाने ज्या हेतूने आनंदाच्या शिध्याची घोषणा केली आहे, तो हेतूच साध्य होत नाही. होळी, गुढीपाडव्याला शिध्याचे वाटप उशिरा झाले. गणपतीचादेखील गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवसांनंतर आनंदाचा शिधा पोहोचला होता. आताही तीच स्थिती आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्थी हे दिवाळीचे तीनही दिवस उलटून गेले तरी, आनंदाचा शिधा पोहोच नाही. याची जबाबदारी ही पुरवठा अधिकाऱ्यांची असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version