। जालना । प्रतिनिधी ।
जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात बुधवारी (दि. 1) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 8 मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कडवंची शिवारात झालेल्या या भीषण अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांपैकी चार महिला या बदनापूर तालुक्यातील निधोना येथील, तर चार महिला केळीगव्हाण येथील रहिवासी आहेत.
समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम सुरू आहे. या कामासाठी पिकअपने महिला आल्या होत्या. काम संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता परत पिकअपमध्ये बसत असताना नागपूरहून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, काही महिला उडून दूर पडल्या. या अपघातात आठ महिला ठार, तर तीन महिला जखमी झाल्या. मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (45), मीना परमेश्वर आदमाने (45), कांचनबाई प्रकाश आदमाने (50), सुमनबाई कचरू आदमाने (70, सर्व रा. निधोना) तसेच लक्ष्मीबाई संतोष मदन (35), ताराबाई गहेनाजी चौधरी (60), कडुबाई रामदास मदन (55, सर्व रा. केळीगव्हाण) यांचा समावेश आहे. या अपघातात प्रयागबाई बाबासाहेब वाघ, कविता विठ्ठल चौधरी, दिनेश रंगनाथ गायकवाड यांच्यासह आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून, या सर्वांता जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.







