| खांब-रोहा | वार्ताहर |
गौरी-गणपतीच्या सणामध्ये गौरी पूजनासाठी आवश्यक असणार्या सूप आणि सुपल्यांना सध्या मोठी मागणी वाढली असून, ठिकठिकाणी सूप विक्रेते सूप-सुपल्या विकत असल्याचे दिसून येत आहेत. एरव्ही घरगुती कामामध्ये व शेतीच्या कामामध्ये सुपांचा वापर केला जात असल्याने ग्रामीण जीवनामध्ये सुपांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर गौरी-गणपतीच्या सणाला सवाष्ण महिला, बालिका यांना गौरी पूजनासाठी सुपाची आवश्यकता असते. या दिवसात नववधू आपल्या माहेरहून विविध फळे, सुका मेवा, पेढे, बर्फी, लाडू तसेच अन्य पदार्थांनी सुपं भरून सासरच्या घरी तसेच सासरकडील आप्तस्वकीय यांना भेट म्हणून देण्याची परंपरागत प्रथा आहे. अर्थातच सुपांचीच आवश्यकता असल्याने सध्या बाजारात सूप विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
गौरींना पूजनासाठी सूप-सुपल्यांची आवश्यकता असल्याने लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या सूप विक्रेते व्यावसायिक व विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होतो. सध्या बाजारात काही जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झालेली दिसत आहे. तर, सुपांच्या किमतीही 150 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. खास वेणीची डिझाईन असलेले सूप हे 200, 250 ते 300/- रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
सूप, सुपल्यांना मागणी वाढली; विक्रेत्यांना सुगीचे दिवस
