114 ठिकाणी दुकानात उपलब्ध
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील गोरगरिबांना अवघ्या 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील 114 रेशन दुकानांत आनंदाचा शिधा पोहोचला असून, त्याचे वितरण सुरू झाले आहे. त्यामुळे लाखो गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळाला आहे.
आनंदाच्या शिध्यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल या जिन्नसाचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील 72 हजार रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. पनवेलमध्ये एकूण 199 रेशनिंग दुकाने आहेत. यापैकी 114 ठिकाणी आनंदाचा शिधा पोहोचला असून, लवकरच अन्य ठिकाणीदेखील आनंद शिधा पोहोचणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांनी दिली. मध्यंतरीच्या काळात हमाल, वाहतूकदार व रेशनिंग दुकानदार संपावर होते. तरीदेखील पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे यांनी नागरिकांना आनंदाचा शिधा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापैकी 114 दुकानात आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानात पोहोचला आहे.