रत्नागिरी थंडीला सुरवात ; मोहोर वाचवण्यासाठी धडपड
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
कोकणात यंदा थंडी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर काही भागात बहरल्याने हा आंबा फेब्रुवारीपर्यंत मिळू शकेल. मात्र, पाडव्यानंतरच हापूस बाजारपेठेत विक्रीला येईल, असा अंदाज शेतकर्यांनी वर्तवला आहे. उत्तरेकडून येणार्या शितलहरींचा प्रवाह अल्प प्रभावी ठरत असल्याने कोकणकिनारपट्टी भागात थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहाटे काही प्रमाणात धुक्यासह आर्द्रतेत वाढ होऊन कमाल तापमान खाली येत आहे. तरी सकाळी आठनंतर तापमानात कमालीची वाढ होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देशासह राज्यातील काही शहरांचा पारा घसरला असताना कोकणात मात्र उकाडा होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला. बागायतदारही अपेक्षित थंडीच्या चिंतेने ग्रासले आहेत. जानेवारीमध्ये अपेक्षित थंडी न पडल्यास आंबा मोहोरावरील फुटीचा वेग मंदावण्याची भीती आहे. फुटीचा वेग मंदावल्यास त्याचा परिणाम फळधारणेवर आणि उत्पादनावरही होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत होते. सध्या पहाटेचा गारवा सोडल्यास दिवसभर तापमानात वाढ होत आहे. तर रात्रीही उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पुढील आठवड्यात पारा आणखी खाली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील आठवड्यात थंडीचा जोर वाढणे अपेक्षित आहे. अन्यथा मोहोराच्या कालावधीत फुटवा फुटण्याचे वेग मंदावण्याची शक्यता आहे. थंडी उशिराने पोहोचल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मोहोर नव्याने येण्याची शक्यता आहे. सध्या आलेला मोहोर वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मोहोर नव्याने आल्यास फळ येण्यासही उशीर होईल आणि उत्पन्न मिळणार नाही. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात आंबा चांगला येईल. मात्र, बाजारात मोठी आवक वाढल्यास दर किती राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील आठवड्यात दापोली परिसरात काही महसुली मंडळात तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहीले आहे.
डिसेंबरला येणारा मोहोर येत आहे. समुद्र किनारी भागात सध्या झाडांना पालवी फुटायला लागली आहे. दसर्यानंतर पाऊस पडल्यामुळे झाडाच्या बुध्यात पाणी मुरल्यामुळे ही पालवी येत आहे. या झाडांना तयार होणारा आंबा मे महिन्यात मिळेल. दसर्यानंतरचा मोहोर 10 टक्के आहे. समुद्र किनार्यापासून दुरवर असलेल्या बागांना चांगली फुट आली आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोरामधून फेब्रुवारी अखेरीस उत्पादन मिळेल. सध्या आंबा हंगामाला पोषक वातावरण आहे.
उमेश रहाटे, आंबा बागायतदार
