| रत्नागिरी | प्रतिनिधी |
चैत्र महिन्याची सुरूवात होताच सर्वांना गुढीपाडव्याचे आणि त्यापाठोपाठ आंब्याचे वेध लागतात. आंब्याचे नाव घेतले की डोळ्यासमोर पहिले नाव येतं ते कोकणचा राजा हापूस याचं. कधी एकदा आंब्याची पेटी घरात आणतो आणि देवासमोर नैवेद्य दाखवून आंबा खातो असेच सगळ्यांना होत असतं. पण यंदा मात्र आंबाप्रेमींसाठी चिंतेची बातमी आहे. कारण यंदा फळांचा राजा, हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे.
यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्केच हापूसच्या कलमांना मोहोर आल्याने फळ हातात येण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागू शकते. कमी कलमांना आलेला मोहोर, तसेच ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस या तिन्ही गोष्टींचा फटका आंब्याच्या पिकाला बसू शकतो. तसेच मोहोर प्रक्रिया लांबल्याने यंदा हापूसचा हंगाम लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा 15 ते 30 दिवस हंगाम लांबण्याची शक्यता आहे.







