| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा निमित्ताने ‘बंदरावरची शाळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातंर्गत इयत्ता 3 री ते 7 वी च्या पाठ्यपुस्तकातील अनेक घटकांची प्रत्यक्ष समुद्रावर जाऊन उपलब्ध साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती घेतली. यामध्ये देशातील बंदराची माहिती, भरती-ओहोटी, उधाणाची भरती, भांगाची भरती, सागर संपत्ती, महासागर तळरचना, लाटनिर्मिती, त्सुनामी निर्मिती, सागर प्रदूषण समस्या व उपाय, विविध प्रकारच्या मासे व मासे पकडण्याच्या साहित्यांची माहिती माहिती मुलांना देण्यात आली.
या उपक्रमामुळे मुलांना समुद्राविषयीची भिती दूर होऊन त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला, त्याचबरोबर पारंपरिक सण व समुद्राला आळवणी करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांकडून समुद्राची पूजा करून नारळ वाहण्यात आला. नृत्य, गायनातून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर, शिक्षक कौशिक ठाकूर, दर्शन पाटील, सुरेखा खराटे, यतीन म्हात्रे, अंकुश पाटील आदींनी मेहनत घेतली.