| सुकेळी | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नागोठणेजवळच असलेल्या ऐनघर पंचक्रोशीतर्फे मौजे हेदवली येथिल अखंड हरिनाम सप्ताह सोहळा रवि. दि.6 ते सोम. दि. 9 एप्रिल या चार दिवसांत अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल रोजी सकाळी गुरुवर्य नारायदादा वाजे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर हेदवली गावातुन भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हेदवली गावात जणु काही हरिनामाचा गजर रंगला होता.
टाळ- मृदुंगाच्या तसेच ज्ञानोबा माऊलींच्या गजरात गावातील सर्व महिला मंडळ, तरुण- तरुणी मोठ्या उत्साहाने या हरिनामाच्या गजरात रंगुन गेले होते. हा अखंड हरिनाम सप्ताह पंचक्रोशीचा असल्यामुळे दर तीन वर्षांनी एकदा हा सोहळा प्रत्येक गावांमध्ये येत असल्यामुळे हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामुळेच या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे येथे कामानिमित्त राहणारे चाकरमानी तसेच माहेरवाशिणी चार दिवस आवर्जून आले होते. या हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गुढिपाडव्याचा दिवस असल्यामुळे गावातील सर्व महिलांनी आपापल्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच प्रत्येकाने घरासमोर मराठी मानाची गुढी देखिल उभारली होती. या पालखी सोहळ्यात सर्व भाविक हरिनामाच्या गजरात दंग होऊन गेले होते. त्यानंतर दुपारी 3 वा. पालखी सोहळा मंदिरात आल्यानंतर आरती घेण्यात आली. शेवटी हेदवली ग्रामस्थांच्यावतीने आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन या भव्यदिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आली.
हेदवली गावातील हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ऐनघर पंचक्रोशीसह ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, आदिमाया नवतरुण मंडळ हेदवली यांनी अपार मेहनत घेतली.