दिवेआगर-वेळासआगर खाडीपूल वगळला की रखडला?

| बोर्ली पंचतन | प्रतिनिधी |

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या अंतिम आराखड्यात वेळासआगर-दिवेआगर खाडीपुलाचा समावेश होणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. सागरी महामार्गाची मूळ संकल्पना कायम असून, किनारपट्टीवरील रस्त्यांची आखणी निश्चित झाल्यानंतर हा खाडीपूल पुन्हा प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुलाच्या उभारणीबाबत स्थानिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

रेवस ते रेड्डी असा सुमारे 498 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित सागरी महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुरुड तालुक्यातील टोकेखार ते म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी (दिघी खाडी), तसेच श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेश्वी (बाणकोट खाडी) या पुलांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, वेळासआगर-दिवेआगर खाडीवरील प्रस्तावित पुलाबाबत अद्याप ठोस हालचाल दिसून येत नसल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार वेळासआगर खाडीपूल, भरडखोल, शेखाडी, कोंडविल इत्यादी किनारपट्टीवरील गावांना वगळून हा महामार्ग वडवली, शिस्ते, कापोली, बोर्लीपंचतन, दिवेआगर, कार्ले, खुजारे, दांडगुरी, चिखलप, भट्टीचा माळ, हरिहरेश्वर आणि दांडा मार्गे बाणकोटकडे नेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अधिसूचनेमुळे वेळासआगर-दिवेआगर खाडीपूल सागरी महामार्गाच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे की त्याचे काम पुढील टप्प्यात प्रस्तावित आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

किनारपट्टीवरील गावे आणि पर्यटनस्थळांना जोडणे, प्रवास सुलभ करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा सागरी महामार्गामागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास महामार्गाच्या मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याची भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली. समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्यांची आखणी निश्चित झाल्यानंतर वेळासआगर-दिवेआगर खाडीपूल पुन्हा प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version