रेल्वेचा शोध लावणाऱ्याची कोनशिला उघड्यावर; ब्रिटिशांनी केला होता सन्मान
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान असा 21 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग मुंबईमधील व्यापारी उद्योगजक आदमजी पीरभॉय यांनी बनवला. 1907 मध्ये स्वतःचे 16 लाख खर्चून मिनीट्रेनच्या मार्गाचे काम केले. पुढे हा नॅरोमार्ग आदमजी पीरभोय यांनी भारतीय रेल्वेचे ताब्यात दिला. त्यावेळी ब्रिटिशांनी अदमजी पिराभोय यांना सर ही पदवी देऊन सन्मानित केले. अशा या महान व्यक्तीची माहिती सांगणारा फलक नेरळ स्थानकात उभा आहे; मात्र, नेरळ स्थानकाच्या मेकओव्हरमध्ये ती कोनशिला उघड्यावर पडली आहे.
मुंबईतील बडे व्यापारी आदमजी पूरभोय हे माथेरान येथे असलेल्या आपल्या बंगल्यावर जाण्यासाठी नेरळ जंक्शन स्थानकात सायंकाळी पोहचलेले. मात्र, त्यावेळी त्यांना माथेरान या डोंगरावर वसलेल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सायंकाळी घोडा मिळाला नाही. त्यामुळे हताश होऊन आदमजी पिरभोय हे मुंबई येथे पोहचले आणि त्यांनी माथेरान येथे जाण्यासाठी स्वतः रेल्वे मार्ग बनविण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांची मदत घेऊन अब्दुल पिरभोय आणि आदमजी पिरभोय यांनी नॅरोगेज मार्गाच्या आराखड्याला अंतिम रूप दिले. 1901मध्ये या प्रकल्पाचे खासगी व्यक्तीकडून काम सुरू करण्यात आले आणि मे 1907 मध्ये हा मार्ग बनून तयार झाला. आणि त्यानंतर स्वतः निर्माण केलेल्या रेल्वे मार्गाने आदमजी आणि त्यांचे बंधू अब्दुल पिरभोय हे माथेरान येथे पोहचले. त्यावेळी कोळशापासून आग निर्माण करणाऱ्या वाफेच्या इंजिनावरून नेरळ-माथेरान मिनीट्रेन चालवली जायची. त्यावेळी ट्रेन चालवण्यासाठी लागणारी चार इंजिने जर्मनी येथून मागवण्यात आली होती. त्यातील एक इंजिन नवी दिल्ली येथील रेल्वे भवन, दुसरे मुंबईतील मध्य रेल्वे परिसरात, तिसरे इंजिन नेरळ जंक्शन स्थानकात, तर चौथे इंजिन माथेरान रेल्वे स्थानकात अभ्यास आणि सार्वजनिक पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे.
पुढे हा नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग आदमजी आणि अब्दुल पिरभोय यांनी भारतीय रेल्वेकडे सुपूर्द केला.स्वतःचे 16 लाख रुपये खर्चून आणि अवघड वळणांचा मार्ग शोधणाऱ्या आदमजी पिरभोय यांना ब्रिटिश सरकारने “सर” या मानाच्या पदवीने सन्मानित केले. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी नेरळ आणि माथेरान स्थानकात कोनशिला बसवण्यात आली आहे. या कोनशिला सध्या अडगळीत पडल्या सारख्या असून, नेरळ स्थानकाचे करोडो रुपये खर्चून मेकओव्हर करण्याचे कार्य सुरू आहे. मात्र, त्या कार्यात सर आदमजी पिरभोय यांच्या स्मृती जपणाऱ्या कोणत्याही वास्तूची उभारणी करण्यात आलेली नाही. मात्र, दुसरीकडे पीरभोय यांची माहिती देणारा चौथरा देखील आता एका बाजूला उभा आहे. त्या चौथऱ्याच्या आजुबाजूला काहीही नाही. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्यांच्या नजरेत देखील तो चौथरा दिसून येत नाही. त्यामुळे नॅरोगेज मार्ग बनवून जगाच्या हेरिटेज नियमावलीत स्थान मिळवण्याची धडपड करणाऱ्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जनक अडगळीत पडल्याची अवस्था निर्माण झाली आहे.
