ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाऱ्याचा इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यावर निसर्ग कोपला असून, मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि आता ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मंगळवार (दि. 7) रायगडला रेड अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आधीच पूर, दरडी आणि अनेक भाग पाण्याखाली गेल्याने विस्कळीत झालेल्या जनजीवनात आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि सखल भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबविले आहे.
आतापर्यंत 200 हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन 14 गावांतील 265 कुटुंबांमधील 937 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात सरासरी 236.60 मि.मी. पावसाची नोंद झाली. खालापूर तालुक्यात सर्वाधिक 323.3 मि.मी., महाडमध्ये 272.2 मि.मी. तर सुधागडमध्ये 268.2 मि.मी. पाऊस झाला. लोणावळा येथे 625 मि.मी. आणि महाबळेश्वर येथे 463 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने रायगडातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यासह सर्व यंत्रणा 24 तास कार्यरत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक माहितीवर तातडीने कार्यवाही केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पूरग्रस्त भाग, नदी, नाले, धबधबे आणि पाणी साचलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तीन नद्या धोक्याच्या पातळीवर
सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना सार्वजनिक ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून, आवश्यक ठिकाणी तातडीने स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे.
घरांचे, पशुधनाचे मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 84 घरांची पडझड झाली असून 242 घरांमध्ये पाणी शिरले आहे. सात गोठ्यांचे नुकसान झाले असून, रोहा तालुक्यातील बाळसई येथील मंदिर, महाडमधील विन्हेरे-सुतारकोंड येथील शाळा आणि 12 खासगी दुकानांचेही नुकसान झाले आहे. पशुधनालाही मोठा फटका बसला असून एक बैल, दोन गायी आणि 86 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून, शासनाकडून मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
25 ठिकाणी दरडी, 73 घरांजवळ भूस्खलन
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 25 ठिकाणी दगड-माती रस्त्यावर कोसळण्याच्या आणि 73 घरांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन जण जखमी झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून रस्ते पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तीन जणांचा मृत्यू, पाच बेपत्ता
अतिवृष्टीशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. पनवेल, कर्जत आणि महाड तालुक्यांतील नदी, धबधबे आणि इतर घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफ व स्थानिक बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
