| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात आज सर्वत्र आकाशात ढगाळ वातावरण असून, रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. समुद्र किनारी भागालगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात देखील मोठ्या लाटा उसळल्या असून मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरु असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याच प्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही आपली होडी किनाऱ्यावर आणली आहे.
किनारपट्टीला अलर्ट
चक्रीवादळाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा वेग असू शकतो. या दरम्यान पुढील दोन ते चार दिवस मच्छीमारांनी गुजरात ते महाराष्ट्र या किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मुसळधार ते आत मुसळधार पाऊस असेल.